कॉँग्रेसचे नाराजवीर प्रदेशाध्यक्षांना भेटणार
By admin | Published: February 4, 2017 10:07 PM2017-02-04T22:07:08+5:302017-02-04T22:07:08+5:30
प्रदेशाला अंंधारात ठेवून मनसेशी छुपी आघाडी
नाशिक : कॉँग्रेस शहराध्यक्षांनी महाराष्ट्र प्रदेश कॉँग्रेसला अंधारात ठेवून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत दोन प्रभागांत छुपी आघाडी केल्याचा आरोप करीत यावर पक्षाने तत्काळ कारवाई करण्याची मागणी कॉँग्रेसच्या एका गटाने केली.
टिळकपथ येथे झालेल्या एका खासगी सहकारी पतसंस्थेत कॉँग्रेसच्या नाराज गटाची बैठक झाली. बैठकीत शहराध्यक्ष शरद अहेर व माजीमंत्री डॉ. शोभा बच्छाव यांच्याविरुद्ध तक्रारींचा पाढा वाचण्यात आला. यावेळी बोलताना वसंत ठाकूर यांनी सांगितले की, प्रभाग तेरामधून आपल्या पत्नीसाठी कॉँग्रेस पक्षाचा एबी फॉर्म येऊनही तो त्यांना न देता या प्रभागातून मनसेशी छुपी युती करीत मनसेला चाल देण्यात आल्याचा आरोप वसंत ठाकूर यांनी शनिवारी (दि.४) सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दायमा व कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्याकडे दूरध्वनीवर केला. ठाकूर यांना खासदार अशोक चव्हाण यांनी यासंदर्भात लेखी तक्रार करण्याची सूचना केली आहे. राजेंद्र बागुल यांनी सांगितले की, पक्षातील निष्ठावंतांचा हा आक्रोश आहे. प्रदेश कॉँग्रेसला अंधारात ठेवून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी छुपी युती प्रभाग १३ व प्रभाग ५ मध्ये करण्यात आली आहे. शिवसेना व भाजपाला चाल देण्यासाठीच जाणूनबुजून कॉँग्रेसचे उमेदवार दिले नसल्याचा आरोप राजेंद्र बागुल यांनी केला. पांडुरंग बोडके यांनी प्रभाग पाचमधून आपल्या कुटुंबीयांना उमेदवारी देण्याचे निश्चित असताना ज्या नरेश पाटील यांच्या मातोश्रींना उमेदवारी दिली ते अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार असून, पक्षाचे नुकसान करीत असल्याचा आरोप केला. शरद अहेर व डॉ. शोभा बच्छाव यांच्यावरच बैठकीत पदाधिकाऱ्यांनी टिकास्त्र सोडले. येत्या गुरुवारी या पदाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी बोलविले आहे. बैठकीस सुरेश मारू, पांडुरंग बोडके, अनिल कोठुळे, रामप्रसाद कातकाडे, बाळासाहेब वाघमारे, भगवान अहेर, नदीम शेख, प्रवीण अहेर, अण्णा मोरे आदिंसह पदाधिकारी उपस्थित होते.