दरवाढीविरोधात काँग्रेसचा एल्गार
By admin | Published: June 26, 2014 12:51 AM2014-06-26T00:51:10+5:302014-06-26T00:51:10+5:30
रेल्वे प्रवासभाडे आणि मालवाहतुकीच्या दरात केलेल्या दरवाढीविरोधात विदर्भात काँग्रेसने अनेक ठिकाणी रेल रोको आंदोलन करीत केंद्र सरकारविरोधात घोषणा दिल्या.
विदर्भात आंदोलन: नागपुरात दक्षिण एक्स्प्रेस, यवतमाळात शकुंतला तर भंडाऱ्यात विदर्भ एक्स्प्रेस रोखली, बडनेरा, चंद्रपूर, गडचिरोलीतही रेल रोको
नागपूर : रेल्वे प्रवासभाडे आणि मालवाहतुकीच्या दरात केलेल्या दरवाढीविरोधात विदर्भात काँग्रेसने अनेक ठिकाणी रेल रोको आंदोलन करीत केंद्र सरकारविरोधात घोषणा दिल्या.
नागपूर रेल्वेस्थानकावर बुधवारी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी रेल रोको आंदोलन केले. आंदोलनकर्त्यांनी सकाळी ९.४५ वाजता प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर आलेली हैदराबाद-ह. निजामुद्दीन दक्षिण एक्स्प्रेस अर्धा तास रोखून धरली. रेल्वे प्रवासभाड्याच्या विरोधात सायंकाळी आम आदमी पक्षानेही जयस्तंभ चौकात भाजपविरोधी नारेबाजी करून नागपूर रेल्वेस्थानकात हस्ताक्षर आंदोलन राबविले. नागपूर शहर काँग्रेस कमिटीने रेल्वे दरवाढीविरोधात शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात आंदोलन केले. त्यांनी सुरुवातीला रेल्वेस्थानकाच्या पश्चिमेकडील भागातील मेनगेटजवळ घोषणाबाजी केली. त्यानंतर १२७२१ हैदराबाद-ह.निजामुद्दीन दक्षिण एक्स्प्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर आल्यानंतर काँग्रेसचे पदाधिकारी शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात रेल्वेस्थानकात शिरले. ते इटारसी एण्डकडील दक्षिण एक्स्प्रेसच्या इंजिनपुढे उभे झाले. काही पदाधिकारी हातात काँग्रेसचे बॅनर, झेंडे घेऊन इंजिनवर चढले, तर काही आंदोलनकर्ते पुढे जाऊन थेट रेल्वे रुळावर झोपले. विदर्भातही काही ठिकाणी रेल्वे रोखून धरण्यात आल्या.
यवतमाळ- काँग्रेस कार्यकर्त्यांनी यवतमाळ रेल्वेस्थानकावर ‘शकुंतला’ रोखून धरली. काँग्रेसचे काही कार्यकर्ते रुळावर आडवेही झाले होते. या आंदोलनाचे नेतृत्व काँग्रेसचे अरुण राऊत, राहुल ठाकरे, अशोक बोबडे, डॉ. वजाहत मिर्झा, डॉ. मोहंमद नदीम, देवानंद पवार आदींनी केले.
अमरावती- बडनेरा रेल्वेस्थानकावर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी व शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने 'रेल रोको' आंदोलन करण्यात आले. अमरावती जिल्हा काँग्रेस कमिटी (ग्रामीण)चे जिल्हाध्यक्ष अनिरुद्ध ऊर्फ बबलू देशमुख व आमदार रावसाहेब शेखावत यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनात जिल्हा काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी सहभागी झाले होते. मोदी सरकार हाय हाय, रेल्वेची भाडेवाढ तत्काळ कमी करावी, असे नारे देऊन भाडेवाढीचा निषेध नोंदविण्यात आला. काँग्रेस कमिटीचे शहर अध्यक्ष संजय अकर्ते, अर्चना सवई, बबलू शेखावत, विलास इंगोले, बंडू देशमुख, भैयासाहेब मेटकर, श्रीराम नेहर, विद्या देटू, उषा उताणे, कुंदा अनासाने, वसंतराव साऊरकर, संजय बोबडे, प्रकाश पहुरकर, प्रवीण घुईखेडकर, मनोज भेले आदी कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.
गडचिरोली - गडचिरोली जिल्ह्यातील वडसा रेल्वेस्थानकावर काँग्रेस पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी बुधवारी रेल रोको आंदोलन केले. या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हसन गिलानी यांनी केले.
गोंदिया- भाजप सरकारने केलेल्या रेल्वे दरवाढीच्या विरोधात तिरोडा तालुका कॉंग्रेस कमेटीने रेल्वे प्रबंधकांना निवेदन दिले. याप्रसंगी काँग्रेस कमेटीचे तालुकाध्यक्ष राधेलाल पटले, डॉ. योगेंद्र भगत, गिरधर बिसेन, माणिक झंझाड, रमेश पटले, मजीत छवारे, हितेंद्र जांभुळकर, इकबाल शेख, टेकचंद पटले, धनराज पटले, रामलाल रहांगडाले उपस्थित होते.
भंडारा- भंडारा रोड व तुमसर रोड रेल्वेस्थानकावर आ.अनिल बावनकर यांच्या नेतृत्वात विदर्भ एक्सप्रेस रोखून ठेवली. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. आंदोलनात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जिया पटेल, माजी मंत्री बंडूभाऊ सावरबांधे आदी उपस्थित होते.
चंद्रपूर- जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश देवतळे, चंद्रपूर शहर अध्यक्ष नंदू नागरकर यांच्या नेतृत्वात चंद्रपूर रेल्वेस्थानकावर घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर पॅसेंजर थांबवून निदर्शने करण्यात आली. यावेळी कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलिसांनीही चोख बंदोबस्त ठेवला होता.(लोकमत न्यूज नेटवर्क)