काँग्रेसची जोरदार ‘मोर्चे’बांधणी
By admin | Published: December 7, 2015 02:13 AM2015-12-07T02:13:05+5:302015-12-07T02:13:05+5:30
हिवाळी अधिवेशनावर काँग्रेस पक्षातर्फे ८ डिसेंबरला काढण्यात येणारा मोर्चा न भुतो न भविष्यती व्हावा यासाठी काँग्रेसने जोरदार तयारी सुरू केली असून
अतुल कुलकर्णी, नागपूर
हिवाळी अधिवेशनावर काँग्रेस पक्षातर्फे ८ डिसेंबरला काढण्यात येणारा मोर्चा न भुतो न भविष्यती व्हावा यासाठी काँग्रेसने जोरदार तयारी सुरू केली असून, स्वत: प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण नागपुरात ठाण मांडून बसले आहेत. मोर्चाचे पहिले टोक टी पॉइंट आणि दुसरे टोक दीक्षाभूमी असेल एवढा मोठा मोर्चा काढण्यात येणार असल्याचा दावा काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने केला आहे.
रविवारी खा. चव्हाण यांनी यासाठी बैठका घेतल्या. प्रत्येक कार्यकर्त्याला जबाबदारी ठरवून देण्यात आली आहे. कोणी किती लोक आणायचे, त्यांची व्यवस्था कशी असेल, येणाऱ्या गाड्या कोठे थांबतील, येणाऱ्यांच्या चहा-पाण्याची व्यवस्था कशी असेल इतक्या बारीक-सारीक गोष्टींचा तपशील पाहिला गेला आहे. बुटीबोरी ते नागपूर या मार्गावरील मंगल कार्यालयांमधून किती जणांची व्यवस्था होईल याचीही पाहणी पूर्ण झाली असून, सगळ्यांना जबाबदाऱ्या ठरवून दिल्या आहेत.
अमरावतीपासून दिवसा, कारंजा, वाडी अशा आजूबाजूच्या ठिकाणचे अधिकाधिक लोक कसे येतील हे पाहिले जात आहे. नागपूर शहरातून मोर्चासाठी कुमक कशी आणता येईल यासाठीची मदत विरोधी गटाकडून घेतली जात आहे. प्रत्येक नेत्याने किती लोक आणायचे हे ठरवले गेले असून, नागपुरात यासाठी एक कंट्रोल रूम उघडण्यात आली आहे. त्याद्वारे किती लोक येणार याची सतत विचारणा केली जात आहे. काही भागातील शेतकरी, आम्हाला मोर्चासाठी यायचे आहे असे सांगत असल्याचा दावाही एका नेत्याने केला. सोशल मीडियाचा वापरही यासाठी केला जात आहे. उद्या सोमवारी खा. चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, नारायण राणे, विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील व अन्य नेत्यांची, पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक ठेवण्यात आली आहे. त्यात मोर्चाची तयारी व अधिवेशनात कोणते विषय कसे हाताळायचे यावर भर दिला जाणार आहे.