नंदुरबार जिल्ह्यात पाच ठिकाणी काँग्रेसची सत्ता
By admin | Published: June 28, 2016 07:42 PM2016-06-28T19:42:41+5:302016-06-28T19:42:41+5:30
जिल्ह्यातील पाच पंचायत समितींमध्ये काँग्रेसची सत्ता आली असून, शहादा पंचायत समिती मात्र राष्ट्रवादीच्या ताब्यात गेली आहे.
ऑनलाइन लोकमत
नंदुरबार, दि. २८ - जिल्ह्यातील पाच पंचायत समितींमध्ये काँग्रेसची सत्ता आली असून, शहादा पंचायत समिती मात्र राष्ट्रवादीच्या ताब्यात गेली आहे.
जिल्ह्यातील सहा पंचायत समितींचे सभापती व उपसभापती पदासाठी मंगळवारी निवडणूक घेण्यात आली.
नंदुरबार येथे राष्ट्रवादीचे चार सदस्य गैरहजर राहिल्याने त्याचा फायदा काँग्रेसला झाला. येथे काँग्रेसच्या रंजना नाईक दोन मतांनी निवडून आल्या. त्यांना नऊ, तर प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीच्या उमेदवारास सात मते पडली.
तळोदा येथे काँग्रेसच्या शांताबाई पवार, तर नवापूर येथे काँग्रेसच्या सविता गावीत बिनविरोध निवडून आल्या.
अक्कलकुवा येथे काँग्रेसच्या एका उमेदवाराने बंडखोरी केल्याने सभापती व उपसभापतीपदाच्या दोन्ही बाजूंकडील उमेदवारांना समान १० मते पडली. यामुळे येथे ईश्वर चिठ्ठीचा आधार घेण्यात आला. त्यात सभापतीपदी काँग्रेसचे बिजा बावा वसावे, उपसभापतीपदी काँग्रेसचे बंडखोर इंद्रपालसिंह राणा यांची नावे निघाल्याने त्यांची निवड झाली.
धडगाव येथे राष्ट्रवादीच्या तीन सदस्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने येथे सत्ता परिवर्तन होऊन सभापतीपदी काँग्रेसचे काळूसिंग सुन्या पाडवी यांची निवड झाली.
शहादा येथे काँग्रेसचे बहुमत आहे. मात्र या पक्षाच्या तीन सदस्यांनी बैठकीस दांडी मारली व सत्ता परिवर्तन होऊन राष्ट्रवादीचे दरबारसिंग पवार यांची निवड झाली.