गुजरातमध्ये काँग्रेसचा मुडदा का उठला? उद्धव ठाकरे

By admin | Published: December 4, 2015 11:36 AM2015-12-04T11:36:54+5:302015-12-04T11:39:47+5:30

मोदींचा गुजरात १०० टक्के भाजपाच्या पाठीशी उभा नाही, हाच गुजरातच्या निकालाचा अर्थ आहे, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे.

Congress's rise in Congress's Mundada? Uddhav Thackeray | गुजरातमध्ये काँग्रेसचा मुडदा का उठला? उद्धव ठाकरे

गुजरातमध्ये काँग्रेसचा मुडदा का उठला? उद्धव ठाकरे

Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि.४  - भाजपवर कुरघोडी करण्याची एकही संधी न सोडणा-या शिवसेनेने गुजरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालावरुन भाजपला टोले लगावले आहेत. मोदींचा गुजरात १०० टक्के भाजपाच्या पाठीशी उभा नाही, हाच गुजरातच्या निकालाचा अर्थ आहे, अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे.  काँग्रेसमुक्त हिंदुस्थानचा नारा पंतप्रधान मोदी यांनी दिला होता, पण बिहारनंतर मोदी-शहा यांच्या गुजरातमध्येच शवपेटीतून काँग्रेसचा ‘मुडदा’ उठून उभा राहिला, हे चित्र देशासाठी चांगले नाही, असा टोला त्यांनी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'च्या अग्रलेखातून लगावला आहे. 
गुजरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत भाजपचा जय झाला असे सांगितले जात असले तरीही या निवडणुकांत काँग्रेसचा पराभव झाला असे म्हणता येणार नाही, असेही उद्धव यांनी म्हटले आहे. गुजरातमध्ये काँग्रेस हरूनही जिंकली आहे. निवडणुकीच्या या निकालामुळे पंतप्रधानांच्या ‘होम पिच’वर भाजपसाठी धोक्याची घंटा वाजली असल्याचे सांगत, असे का घडले, यावर त्या मंडळींनी मंथन व चिंतन करावे, असा सल्लाही उद्धव यांनी दिला आहे. 
 
काय म्हटले आहे अग्रलेखात :
- बिहार विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने सपाटून मार खाल्ला. त्यामुळे गुजरातच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काय होतेय, याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले होते. हार्दिक पटेलचे ‘पाटीदार’ आंदोलन व मोदी सरकारची घसरत चाललेली लोकप्रियता यामुळे गुजरातच्या या निवडणुकांचा निकाल बिहारप्रमाणेच लागेल असे वातावरण होते. आता निकाल लागले आहेत व ग्रामीण विरुद्ध शहरी अशी सरळ विभागणी झालेली दिसते. महानगरपालिकांवर भाजपचा झेंडा फडकला तर जिल्हा परिषदांत काँग्रेसचा हात मजबूत झाला. निकालाचा अर्थ इतकाच की, मोदींचा गुजरात शंभर टक्के भाजपच्या मागे उभा राहिलेला दिसत नाही. गुजरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत भाजपचा जय झाला असे सांगितले जाते. म्हणजे अहमदाबाद, जामनगर, सुरत, वडोदरा, राजकोट, भावनगर या महानगरपालिका भाजपने जिंकल्या, पण या निवडणुकांत काँग्रेसचा पराभव झाला असे म्हणता येणार नाही. 
- या निवडणुकीत कोण जिंकले आणि कोण हरले या चिवडाचिवडीत कोणी पडू नये. बिहारात काँग्रेसला संजीवनी मिळाली हे ठीक, पण गुजरातसारख्या राज्यात काँग्रेसला जीवदान मिळणे चिंताजनक आहे. गुजरातमध्ये काँग्रेस हरूनही जिंकली आहे. पंतप्रधानांच्या ‘होम पिच’वर भाजपसाठी धोक्याची घंटा वाजली असेल तर हे असे का घडले, यावर मंथन व चिंतन त्या मंडळींनी करायचे आहे. 
- ज्या बिहारने लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांना जबरदस्त यश दिले त्याच बिहारने विधानसभा निवडणुकीत मोदी व अमित शहा यांचे काहीएक ऐकले नाही. पण बिहार व गुजरातमध्ये फरक आहे. मोदी यांनी गुजरात पॅटर्नचा प्रचार करून देश जिंकला व दिल्ली काबीज केली. मोदी हे सध्या पंडित नेहरूंप्रमाणे जागतिक स्तरावर चमकत आहेत, पण देशाचे प्रश्‍न वेगळे आहेत व अनेक आघाड्यांवर चिंतेचे वातावरण आहे. महागाईवर नियंत्रण येत नाही व भडकलेला वणवा थंड होत नाही. महाराष्ट्रासारख्या राज्यात भाजपचे मुख्यमंत्री व सरकार असले तरी तूरडाळीसह अनेक जीवनावश्यक वस्तूंचे भाव वणव्यासारखे भडकले आहेत. हीच परिस्थिती कमीअधिक प्रमाणात सर्वच राज्यांत आहे. 
- पाकिस्तानच्या हल्ल्यात रोज जवान जखमी होत आहेत किंवा शहीद होत आहेत. गुजरात राज्यातले लोक सैन्यात नसले तरी इतर राज्यांत सैनिकांचे ‘ताबूत’ म्हणजे शवपेट्या जातात तेव्हा त्या माता-पित्यांचे, मुलाबाळांचे सरकारला शापच लागत असतात, पण गुजरातसारख्या व्यापारी व कृषिप्रधान राज्यातही भाजपला नाराजीचा सामना करावा लागत आहे. विकासाच्या बाबतीत गुजरात अव्वल हे चित्र खरे असेल तर ग्रामीण भाग भाजपच्या विरोधात का गेला, हा अभ्यासाचा विषय आहे.
- राष्ट्रीय स्वयंसेवक संघातदेखील गुजरातमध्ये अवघ्या दीड वर्षात परिस्थिती एवढी कशी बदलली याविषयी चिंता व्यक्त होत आहे आणि ती साहजिकच आहे. जो काँग्रेस पक्ष मागील १५ वर्षांत त्या राज्यात केवळ नाममात्र शिल्लक होता तो अचानक भाजपला टक्कर देण्याच्या स्थितीत कसा आला हा संघासाठी चिंतेचा आणि चिंतनाचाच विषय आहे.

Web Title: Congress's rise in Congress's Mundada? Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.