नगर जिल्ह्यात काँग्रेसचा वरचष्मा
By admin | Published: February 26, 2017 01:25 AM2017-02-26T01:25:25+5:302017-02-26T01:25:25+5:30
नगर जिल्ह्यात मतदारांनी संमिश्र कौल देत सर्वच पक्षांना भानावर आणले आहे. दोन्ही काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या, पण गतवेळीपेक्षा त्यांच्या जागा घटल्या.
- सुधीर लंके, अहमदनगर
नगर जिल्ह्यात मतदारांनी संमिश्र कौल देत सर्वच पक्षांना भानावर आणले आहे. दोन्ही काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या, पण गतवेळीपेक्षा त्यांच्या जागा घटल्या. भाजपाला मतदारांनी एका हाताने दिले व दुसऱ्या हाताने काढले. कारण त्यांची ताकद वाढवली पण आमदारांच्या बालेकिल्यांतच त्यांना धक्का दिला. शिवसेनेच्या नेतृत्वाला तर नगरसारख्या राजकारणातील बलाढ्य जिल्ह्याचे काहीही सोयरसूतक दिसत नाही. त्यामुळे मतदारांनी त्यांच्या पदरात तसेच माप टाकले आहे.
नगर जिल्ह्यात ७२पैकी काँग्रेसने सर्वाधिक २३, तर राष्ट्रवादी १८, भाजपा १४ व शिवसेनेने ७ जागा मिळविल्या आहेत. या जिल्हा परिषदेवर आजवर सातत्याने दोन्ही काँग्रेसचा झेंडा राहिला आहे. याहीवेळी याच पक्षांना सर्वाधिक जागा असल्याने ते आघाडी करून सत्तेत येऊ शकतात.
माजी आमदार शंकरराव गडाख बाहेर पडल्याने राष्ट्रवादीला नेवासात पाच जागांचा फटका बसला. ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांच्या अकोले मतदारसंघातही भाजपाचा उदय झाला आहे. पंचायत समितीची सत्ता पिचडांना गमवावी लागणार आहे. श्रीगोंद्यात राष्ट्रवादीचा आमदार आहे. मात्र, तेथेही पंचायत समितीत भाजपाचे बबनराव पाचपुते यांनी कमळ फुलविले.
काँग्रेसचीही हीच अवस्था आहे. विखे-थोरात हे मात्तबर नेते पक्षाकडे असतानाही काँग्रेस २८वरून २३ जागांवर आली. या दोघांतील भांडणेच यास कारणीभूत आहेत. थोरात यांनी संगमनेर व विखे यांनी राहाता हे आपापले गड तेवढे राखले. जिल्ह्यात १४पैकी ६ तालुके असे आहेत जेथे जिल्हा परिषद, पंचायत समितीत काँग्रेसला भोपळाही फोडता आलेला नाही. श्रीरामपूरचे काँग्रेस आमदार भाऊसाहेब कांबळे यांनीच या वेळी पक्षाविरोधात काम केले.
श्रीगोंदा, भाजपा आमदार मोनिका राजळे यांचा पाथर्डी, राम शिंदे यांचा कर्जत-जामखेड व अकोले या मतदारसंघांत भाजपा वाढली. मात्र, भाजपा आमदार शिवाजी कर्डिले व स्नेहलता कोल्हे यांच्या नगर व कोपरगाव या तालुक्यांतच पक्ष भुईसपाट झाला. नेवाशातही आमदार असताना तेथे या पक्षाला केवळ एक जागा मिळाली.
‘मिशन फोर्टी’ बासनात
भाजपाकडून पालकमंत्री राम शिंदे यांनी ‘मिशन फोर्टी’ म्हणजे ४० जागा आणण्याचा नारा दिला होता. पण, त्यांचे हे मिशन ‘फोर्टीन’ म्हणजे चौदा जागांवर अडकले. अर्थात गतवेळी भाजपा सहा जागांवर होता.
या वेळी त्यांच्या जागा दुपटीने वाढल्या. जिल्ह्यात एकमेव या पक्षाला वाढ मिळाली. राष्ट्रवादीच्या जागा घटवून ती जागा भाजपाने घेतली.
दोन्ही काँग्रेसला एकत्रित येऊन सत्ता स्थापन करणे सोपे आहे. पण नेत्यांच्या महत्त्वाकांक्षा बघता काहीही समीकरणे आकाराला येऊ शकतात. या वेळी थोरात हे विखे यांना साथ करतील, अशी शक्यता नाही. थोरात गट अध्यक्षपदाचा दावेदार आहे. राष्ट्रवादीही गडाखांच्या आघाडीला सोबत घेऊन अध्यक्षपदासाठी दावा ठोकण्याच्या तयारीत आहे.