पर्यावरणाचा -हास केल्याप्रकरणी मीरा-भाईंदर पालिका अभियंत्यांसह चौघांवर गुन्हा
By admin | Published: February 8, 2017 11:13 PM2017-02-08T23:13:56+5:302017-02-08T23:13:56+5:30
दीपक खांबितसह ठेकेदार व जप्त केलेल्या डंपरचा चालक-मालक विरुद्ध बुधवारी गुन्हा दाखल केला आहे
ऑनलाइन लोकमत
मीरा रोड, दि. 8 - भाईंदर पश्चिमेस महापालिकेने नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानाचे विस्तारीकरणासाठी कांदळवन व पाणथळ क्षेत्रात सातत्याने चालवलेल्या मातीभरावप्रकरणी भाईंदर पोलीस ठाण्यात पालिकेच्या बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दीपक खांबितसह ठेकेदार व जप्त केलेल्या डंपरचा चालक-मालक विरुद्ध बुधवारी गुन्हा दाखल केला आहे. खांबित यांच्यावर हा दुसरा गुन्हा आहे.
वास्तविक सीआरझेड 1 मध्ये पालिकेने बेकायदा कचरा-माती भराव करून बोस मैदान तयार केले. गेल्या दीड वर्षापासून पालिकेने विस्तारीकरणाच्या नावाखाली मुंबई उच्च न्यायालयाचे मनाई आदेश धुडकावून कांदळवन व पाणथळ क्षेत्रत सातत्याने माती भराव बांधकामे करून पर्यावरणाचा -हास चालवला आहे. शनिवारी या ठिकाणी एक डंपर माती भराव करताना पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांच्या आदेशाने पोलिसांनी ताब्यात घेतला आणि गुन्हा दाखल करण्याबाबत प्रांत अधिकारी सुदाम परदेशी यांना कळवले. परदेशी यांच्या आदेशाने मंडळ अधिकारी लक्ष्मण पवार यांनी फिर्याद दिली.
दीपक खांबित सह भराव आदी करणारे ठेकेदार प्रकाश जाधव, डंपरचा मालक विक्रम शिंदे रा. कामण व चालक संतोष नांगरे रा. केतकी पाडा अशा चौघां विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वर्षभरापूर्वी याच परिसरात माती भराव करून कांदळवनाचा रहास केल्या प्रकरणी करनी चरण या ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. तर काही महिन्यांपूर्वी कांदळवनात शौचालये बांधल्या प्रकरणी खांबित यांच्यावर भाईंदर पोलिस ठाण्यातच गुन्हा दाखल झाला होता. पोलिस निरीक्षक राजेंद्र कांबळे पुढिल तपास करीत आहेत.