वाढत्या उष्णतेचा पक्ष्यांच्या आरोग्यावर होतोय परिणाम
By admin | Published: May 19, 2016 03:11 AM2016-05-19T03:11:23+5:302016-05-19T03:11:23+5:30
दिवसेंदिवस वाढणाऱ्या उष्णतेमुळे मानवी जीवनाबरोबरच पक्ष्यांनाही शारीरिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
नवी मुंबई : दिवसेंदिवस वाढणाऱ्या उष्णतेमुळे मानवी जीवनाबरोबरच पक्ष्यांनाही शारीरिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शहरातील पशुपक्ष्यांवर उपचार करणाऱ्या वाशीतील भूमी जीवदया या सामाजिक संस्थेच्या वतीने उष्णतेमुळे पक्ष्यांवर होणाऱ्या आजारांवर मोफतपणे उपचार केले जात आहेत.
उष्णतेच्या लाटेबरोबरच पाणीटंचाईची समस्या असल्याने पाणी न मिळाल्याने अनेक चिमण्यांना जीव गमवावा लागत आहे, तर पुरेसे पाणी न मिळाल्याने आकाशात झेप घेणारे हे पक्षी खाली कोसळल्याने दुखापत होण्याचे प्रमाणही वाढले आहे. शहरीकरणामुळे जंगल नष्ट झाले असून, पक्ष्यांना हक्काचा निवारा मिळत नाही. त्यामुळे इमारतीच्या जंगलात राहणा-या या पक्ष्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. पाण्याची तहान भागविण्यासाठी भूमी जीवदया संस्थेच्या वतीने शहरात ठिकठिकाणी भांडी ठेवली जात असून, अनेक सामाजिक कार्यकर्त्यांमध्येही या भांड्यांचे वाटप करण्यात आले आहे. पंखांना इजा होणे, पायाला दुखापत होणे, अशक्तपणा आदींवर इलाज केले जात असल्याची माहिती भूमी जीवदया संस्थेचे सागर सावला यांनी सांगितले. कबुतर, कोंबडी यासारख्या पक्ष्यांमध्ये राणीखेत (मानमोडी)सारखे आजार पाहायला मिळत असून, यामध्ये पक्ष्यांच्या अंगावर पुरळ उठणे तसेच ३६० अंशात मान मोडणे अशी लक्षणे पाहायला मिळतात. वाढत्या उष्णतेमुळे ती सहन न झाल्याने अशा प्रकारच्या आजारांचे प्रमाण पाहायला मिळत असल्याची माहिती डॉ. महेंद्र चौधरी यांनी दिली. पक्ष्यांनाही मोठ्या प्रमाणात डीहायड्रेशनचा त्रास सहन करावा लागत असल्याचे डॉ. महेंद्र चौधरी यांनी सांगितले. नागरिकांनी घराच्या खिडकीत, गॅलरीमध्ये, कार्यालयात छोटेसे भांडे ठेवावे. त्यात पाणी ठेवल्यास पक्ष्यांची तहान भागवता येईल, यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेण्याचे आवाहान पर्यावरणप्रेमींकडून करण्यात आले आहे.
उडता उडताच बेशुद्ध
दिवसेंदिवस कमी होणार हरीत पट्टे, पाण्याच्या शोधात दूरवर उडणाऱ्या या पक्ष्याच्या शरीरातील पाणी कमी झाल्याने उडता उडता बेशुद्ध पडण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असून, भूमी जीवदयाचे स्वयंसेवक स्वत: तिथे जाऊन या पक्ष्यांवर इलाज करीत आहेत. यामध्ये घारी, कबुतर, पोपट, बगळे आदी पक्ष्यांचा समावेश असून, या पक्ष्यांना मल्टिव्हिटॅमिन्स, ग्लुकोजचे पाणी तसेच अॅण्टिबायोटिक्स देऊन ते बरे झाल्यानंतर त्यांना पुन्हा स्वच्छंदीपणे झेप घेण्यासाठी सोडले जाते.