बाळासाहेबांच्या स्मारकासाठी जागा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2017 03:53 AM2017-01-05T03:53:42+5:302017-01-05T03:53:42+5:30
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी महापौर बंगल्याची जागा तीस वर्षांच्या लिजवर देण्यास राज्य सरकारने आज मंजुरी दिली. तशी अधिसूचनादेखील काढण्यात आली आहे.
मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी महापौर बंगल्याची जागा तीस वर्षांच्या लिजवर देण्यास राज्य सरकारने आज मंजुरी दिली. तशी अधिसूचनादेखील काढण्यात आली आहे.
या स्मारकासाठी स्थापन करण्यात आलेल्या ट्रस्टला सदर जागा हस्तांतरित करण्यात आली आहे. ही जागा मिळाल्याने आता स्मारकाचा मार्ग प्रशस्त झाला आहे.
बुलेट ट्रेन, फेरीवाला धोरणावरून शिवसेनेच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या मंगळवारच्या बैठकीतून वॉकआऊट केले होते. या पार्श्वभूमीवर भाजपा-सेनेतील वाद वाढल्याची चर्चा असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकासाठी जागा देत शिवसेनेचा राग शांत करण्याचा प्रयत्न केल्याचे म्हटले जात आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे या स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष आहेत.
मुंबई पालिका निवडणुकीच्या तोंडावर स्मारकासाठी जागा मिळाल्याने शिवसेनेलाही दिलासा मिळाला आहे. छत्रपती शिवरायांच्या स्मारकाचे भूमिपूजन झाले, इंदू मिलच्या जागेवर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचेही भूमिपूजन झाले. तथापि, शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाच्या भूमिपूजनाचा मुहूर्त अद्याप सापडलेला नाही. आता स्मारकासाठीची जमीन अधिकृतपणे ट्रस्टला मिळाली असली तरी भूमिपूजन लगेच होण्याची शक्यता नाही.पालिका निवडणुकीच्या आचारसंहितेचा फटका भूमिपूजनाला बसू शकतो. (विशेष प्रतिनिधी)