पहिली ते आठवीच्या दीड कोटी विद्यार्थ्यांना दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2021 03:47 AM2021-04-04T03:47:16+5:302021-04-04T03:47:38+5:30
परीक्षा न देताच पास झाल्याचा मुलांमध्ये आनंद; शैक्षणिक गुणवत्तेच्या मोजमापावर मात्र प्रश्नचिन्ह
- सीमा महांगडे
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न देता पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला असून याचा फायदा तब्बल १ कोटी ५६ लाख ९३ हजार ५४२ विद्यार्थ्यांना होईल. यात जिल्हा परिषदेच्या अनुदानित, विनाअनुदानित, खासगी, प्राथमिक / माध्यमिक सर्व शाळांतील विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
विद्यार्थ्यांना परीक्षेतून सूट मिळाल्याचा आनंद होत असला तरी दुसरीकडे अनेक शिक्षणतज्ज्ञ, विशेषतः पालकांनी चिंता व्यक्त केली. सर्वंकष मूल्यमापनाच्या आधारावर यंदा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक मूल्यमापन न झाल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार असल्याची भीतीही व्यक्त केली. यंदा गुगल, व्हाॅट्सअप, टीव्ही चॅनल यांच्या माध्यमातून अथक प्रयत्न करूनही ऑनलाइन शिक्षण नेमके किती विद्यार्थ्यांपर्यत पोहचले किंवा यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत किती भर पडली हा प्रश्न अनुत्तरीतच असल्याच्या प्रतिक्रिया शिक्षणतज्ज्ञ देत आहेत. अशा परिस्थितीत यंदा पुन्हा परीक्षेविना विद्यार्थी पुढच्या वर्गात जाणार असल्याने त्यांच्या शैक्षणिक प्रगतीविषयी पालक, तज्ज्ञांना चिंता वाटत आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान शिक्षण विभाग कसे भरून काढणार किंवा त्यासाठी त्यांनी नियोजन करण्याची आवश्यकता आहे, अन्यथा हे शैक्षणिक वर्ष फुकट गेल्याची नाराजी पालकांमध्ये आहे.
या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनासाठी ऑनलाइन परीक्षांचा पर्याय का नाही स्वीकारला, असे प्रश्न पालक विचारत आहेत. तर विद्यार्थ्यांच्या सर्वंकष मूल्यमापनासाठी शिक्षण विभागाचा सदर प्रयत्न चालू होता. मात्र कोरोनाचा वाढत संसर्ग लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याची प्रतिक्रिया शिक्षण विभागातील काही अधिकाऱ्यांनी दिली.
दहावी, बारावीच्या परीक्षा नियोजनानुसारच
पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना वर्गोन्नती देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आल्यानंतर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावी व बारावीच्या परीक्षा या नियोजित वेळापत्रकानुसार ऑफलाइन पद्धतीनेच होणार असल्याचे पुन्हा स्पष्ट केले.
ऑफलाइन पद्धतीने परीक्षा होणार असल्या तरीही २५ टक्के
अभ्यासक्रमात कपात, स्वतःचेच शाळा, कनिष्ठ महाविद्यालय परीक्षा केंद्र, ज्या विद्यार्थ्यांना कोविड-१९ संसर्ग झाल्यास किंवा इतर आपत्कालीन कारणामुळे परीक्षा देता येणार नाही, त्यांना जूनमधील परीक्षांची संधी अशा विशेष सवलती दिल्याचेही शिक्षणमंत्री गायकवाड यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले.
वर्षभरातील प्रगतीचा अंदाज येईल
अकारिक मूल्यमापन, त्यांना दिले गेलेले स्वाध्याय, त्यांनी ऑनलाइन वर्गांना दर्शविलेली उपस्थिती, चाचण्यांना दिलेला प्रतिसाद या सर्वांच्या माध्यमातून एससीईआरटीकडून विद्यार्थ्यांना कशी वर्गोन्नती (पुढील वर्गात प्रवेश) द्यावी, यासंदर्भात मार्गदर्शक सूचना दिल्या जाणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची वर्षभरातील शैक्षणिक प्रगती काय, याचा अंदाज नक्कीच पालकांना व शिक्षकांना येईल, याची काळजी घेतली जाईल.
- दिनकर टेमकर, संचालक, एससीईआरटी
विशेष कार्यक्रमाची अंमलबजावणी गरजेची
सध्याची परिस्थिती अतिशय असाधारण आहे. या काळात विद्यार्थ्यांना वर्गोन्नत करण्याचा शिक्षण विभागाचा निर्णय योग्य आहे. मात्र कोविड काळात झालेले शैक्षणिक नुकसान (लर्निंग लॉस) भरून काढण्यासाठी शाळा सुरू झाल्यानंतर ब्रीज कोर्ससारख्या विशेष कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे.
- भाऊसाहेब चासकर, शिक्षणतज्ज्ञ
पाल्य काय शिकला, कसे समजणार?
ऑनलाइन शिक्षणात मूल्यमापनाचा मार्गच बंद झाला आहे. शिक्षणासाठी आधीचे शिक्षण हा पाया असतो, मात्र परीक्षाच नाही म्हटल्यावर आमच्या पाल्य ऑनलाइन शिक्षणात नेमके काय शिकला, याचा स्तर मोजता येणार नाही.
- सुवर्णा कळंबे, पालक
काेराेनामुळे मुंबईत शाळा बंद हाेत्या. मुलांनी ऑनलाइन अभ्यास केला. आता परीक्षेविना मुले पुढच्या वर्गात जाणार असल्याने त्यांच्या शैक्षणिक प्रगतीची चिंता पालकांना सतावत आहे.