संघाकडून गांधींना बदनाम करण्याचे षड्यंत्र
By admin | Published: October 15, 2016 02:35 AM2016-10-15T02:35:00+5:302016-10-15T02:35:00+5:30
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून गांधीजींना चुकीच्या पद्धतीने समोर आणले जात आहे. गांधीजींनी भारतीय स्वातंत्र्याची चळवळ जनचळवळ केली आणि फॅसिझमला रोखले.
पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून गांधीजींना चुकीच्या पद्धतीने समोर आणले जात आहे. गांधीजींनी भारतीय स्वातंत्र्याची चळवळ जनचळवळ केली आणि फॅसिझमला रोखले. कारण, फॅसिझम आला असता, तर सामंतशाही टिकली असती. ब्राह्मणांचे श्रेष्ठत्व गेले म्हणूनच युती करून गांधींना बदनाम करण्याचे षड्यंत्र आखले जात आहे, असा आरोप ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांनी शुक्रवारी केला.
मारवाडी फाउंडेशन, नागपूरतर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांना प्रदान करण्यात आला, त्या वेळी ते बोलत होते. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील, ज्येष्ठ विचारवंत माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर, फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. पाच लाख रुपये, स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफल, असे पुरस्काराचे स्वरूप होते.
मारवाडी फाउंडेशनसारख्या धर्मनिरपेक्ष विचारसरणीवर काम करणाऱ्या आणि खंबीर भूमिका घेऊन कार्यशील राहणाऱ्या संस्थेकडून पुरस्कार मिळतोय, याचा विशेष आनंद आहे, अशी भावना व्यक्त करून डॉ. कसबे म्हणाले, ‘‘अनेक दिवसांपासून मनात अस्वस्थता आहे. सर्वसामान्य नागरिक संभ्रमात असतात, तेव्हा राजकीय लोक त्यांना अधिक संभ्रमित करतात. त्यांना प्रकाश दाखविण्याचे काम विचारवंत करतात. आज देशात अशांततेचे वातावरण आहे.
महात्मा गांधी, पंडित नेहरू आणि डॉ. आंबेडकर ही या देशांची तीन रत्ने आहेत. मात्र, देशात गांधीजींचे नाव खूप खराब पद्धतीने घेतले जाते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून त्यांचा उल्लेख मोहनदास गांधी केला जातो. त्यांना चुकीच्या पद्धतीने समोर आणले जात आहे. गांधींबद्दल एवढा राग का? त्यांनी काय बिघडवलंय तुमचं? गांधीजींनी भारतीय स्वातंत्र्याची चळवळ जनचळवळ केली. फॅसिझमला रोखले, कारण फॅसिझम आला असता, तर सामंतशाही टिकली असती. ब्राह्मणांचे श्रेष्ठत्व गेले, जहागिरीपण गेली आणि लोकशाही आणली. त्यामुळे युती करून गांधींना बदनाम करण्याचे षड्यंत्र आखले जात आहे. या देशाची जडणघडण या तीन महापुरुषांनी केली आहे. त्याची विस्मृती आपल्याला झाली आहे. त्यामुळे भविष्यकाळ अंधारात जाण्याची भीती आहे.’’
चव्हाण म्हणाले, ‘‘सध्या निघणारे मोर्चे, जटिल प्रश्न आणि त्यांची उकल या विषयांवर सामान्यांमध्ये वैचारिक गोंधळ सुरू आहे. आपण कोणत्या मार्गाने जायचे, हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. सरकारची भूमिका महत्त्वाची असली, तरी सरकारच्या भूमिकेवर लोकांचा विश्वास नाही. दाभोलकर, पानसरे आणि कलबुर्गी या घटनांची उदाहरणे ताजी आहेत. लोकहित कशामध्ये आहे, याचे सरकारला भान नाही. त्यामुळे समाजातील सध्याचा वाढता वैचारिक दहशतवाद मोडून काढण्याची आवश्यकता आहे.’’
डॉ. मुणगेकर म्हणाले, ‘‘डॉ. आंबेडकर काय आहेत, हे देशाला जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत देशाचे मूलभूत प्रश्न सुटणार नाहीत. देशातील हे एकमेव असे राजकीय नेतृत्व होते, ज्यांना देशातील प्रश्न आणि उत्तरे माहीत होती. त्यांच्या विचारांना घेऊन काम करणारे डॉ. कसबे यांनी जातीसोबतच वर्गसंघर्षाची बाजूदेखील मांडली. मानवी समाजाच्या अज्ञानातून धर्माची उत्पत्ती झाली आहे, अशी धर्मचिकित्सादेखील केली. तरीही, सध्या अनेकांच्या प्रामाणिक विचारांवर गदा आणली जात आहे. ही फॅसिझमची सुरुवात असून भारतीय लोकशाही टिकवायची असेल, तर फॅसिझम पुढे येता कामा नये.’’ प्रास्ताविकात डॉ. गिरीश गांधी म्हणाले, ‘‘संपूर्ण देशाचा विचार करून समाजात जे-जे उपेक्षित आणि वंचित घटक आहेत, त्यांना शक्ती प्रदान करणे हे फाउंडेशनचे प्रथम कर्तव्य आहे. या दिशेने जो राष्ट्रीय यज्ञ सुरू आहे, त्यात समिधा टाकून आपले योगदान देण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे.’’
डॉ. डी. वाय. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. बाळ कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. सुधीर बाहेती यांनी आभार मानले.
(प्रतिनिधी)