छोट्या व्यापाऱ्यांना संपविण्याचे षड्यंत्र

By Admin | Published: April 13, 2016 03:02 AM2016-04-13T03:02:18+5:302016-04-13T03:02:18+5:30

सराफांवर जबरदस्तीने लादण्यात येणारा अबकारी कर हा छोट्या व्यापाऱ्यांसह कारागिरांना संपविण्याचे मोठे षड्यंत्र आहे, अशा शब्दांत काँग्रेस उपाध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी केंद्र

Conspiracy to destroy small traders | छोट्या व्यापाऱ्यांना संपविण्याचे षड्यंत्र

छोट्या व्यापाऱ्यांना संपविण्याचे षड्यंत्र

googlenewsNext

मुंबई : सराफांवर जबरदस्तीने लादण्यात येणारा अबकारी कर हा छोट्या व्यापाऱ्यांसह कारागिरांना संपविण्याचे मोठे षड्यंत्र आहे, अशा शब्दांत काँग्रेस उपाध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. काही बड्या उद्योजकांना फायदा व्हावा म्हणून सरकार छोट्या सराफांसह कारागिरांना चिरडू पाहत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
देशभरातील सराफांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी घेतलेल्या जाहीर सभेत खा. गांधी बोलत होते. मुंबई ज्वेलर्स असोसिएशन, संघटना आणि सुवर्ण कारागीर संघटनांनी आयोजित केलेल्या या सभेसाठी झवेरी बाजारमधील शेख मेनन स्ट्रीट हाउसफुल्ल झाला होता. कडक उन्हातही हजारो किरकोळ आणि घाऊक सराफा व्यापारी, कारागीर आणि सुवर्णकार सभेसाठी तळ ठोकून होते.
या वेळी बोलताना खा. गांधी यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली. ते म्हणाले, शेतकऱ्यांना कमी लेखत भाजपा प्रणीत केंद्र सरकारने गरिबांच्या जमिनी मूठभर बड्या उद्योजकांच्या घशात घालण्यासाठी सुधारित जमीन अधिग्रहण कायदा आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, काँग्रेसने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहत या कायद्याला कडाडून विरोध केला होता. त्यानंतर तीन वेळा सरकारने अध्यादेश काढण्याचा प्रयत्न केला. मात्र काँग्रेसने तो हाणून पाडला. या लढाईत शेतकरी काँग्रेससोबत खांद्याला खांदा लावून उभे होते. त्यामुळे केंद्र सरकारला माघार घ्यावी लागली. सराफांच्या बाबतही काही अशीच परिस्थिती असल्याचे ते म्हणाले.
देशात ७ कोटींहून अधिक असलेले छोटे व्यापारी आणि कारागीर यांच्याकडून भाजपाला हजारो कोटी रुपये मिळणार नाहीत, म्हणून हजारो कोटी रुपये देणाऱ्या १० ते १२ बड्या उद्योजकांच्या फायद्यासाठी सरकार गरीब आणि असाह्य सराफांना चिरडू पाहत आहे, असा आरोपही राहुल यांनी केला. ते म्हणाले की, व्यापारी आणि कारागीर यांच्यातील एकजुटीमुळे सराफा व्यावसायिकांना चिरडणे शक्य नाही. ४० दिवसांहून अधिक मोठी लढाई सराफांनी लढली आहे. काँग्रेस संसदेमध्ये सराफांचा आवाज उचलून धरेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
मेक इन इंडियाला किंवा मोठ्या उद्योजकांना काँग्रेसचा विरोध नसल्याचे स्पष्ट करून खा. गांधी म्हणाले, मेक इन इंडियामध्ये मोठ्या उद्योजकांसह छोट्या व्यापाऱ्यांचा विकासही झाला, तरच देशाची प्रगती होईल. बड्या उद्योजकांच्या फायद्यासह छोट्या व्यापारी आणि कारागिरांचाही फायदा व्हायला
हवा. त्यामुळे ही लढाई केवळ सराफा आणि कारागिरांची राहिलेली नाही. आत्ता ही काँग्रेसची लढाई आहे. सरकारवर जितका दबाव टाकू, तितक्या लवकर ही लढाई जिंकण्याची आशा त्यांनी व्यक्त केली. मुंबई, महाराष्ट्र आणि संसदेमध्ये प्रत्येक ठिकाणी काँग्रेस छोटे व्यापारी आणि कारागिरांसोबत मिळून ही लढाई लढेल, असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

मुंबादेवीचे दर्शन
देवनार डम्पिंग ग्राउंडची पाहणी करून झवेरी बाजारमधील जाहीर सभेला मार्गदर्शन करण्याआधी राहुल गांधी यांनी येथील मुंबादेवीचे दर्शन घेतले.
मुंबादेवीचरणी खणा-नारळाची ओटी अर्पण करून राहुल यांनी देवीचरणी मस्तकही टेकले. पाच ते दहा मिनिटे मंदिरात दर्शन घेतल्यानंतर दुपारी ३च्या सुमारास ते सभेच्या व्यासपीठावर पोहोचले.

‘सबकी भूल कमल का फूल’
आधी ‘वोट’ आणि ‘नोट’ घेतल्यानंतर भाजपा सरकार छोट्या व्यापाऱ्यांना रस्त्यावर आणत असल्याचा आरोप काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी केला. ते म्हणाले की, २०१२ साली काँग्रेसने अबकारी कर लावला, त्या वेळी मुंबईतील काँग्रेसचे सर्व खासदार व्यापाऱ्यांसोबत होते. आणि काही दिवसांतच हा कर मागे घेण्यात आला.
मात्र मतांची भीक मागणारे भाजपाचे खासदार कराविरोधात सराफांसोबत कुठेही दिसत नाहीत. त्यामुळे कमळाच्या फुलाला मतदान करून सगळ्यांनी भूल (चूक) केल्याचेही ते म्हणाले. सभेला उपस्थित हजारो व्यापारी आणि कारागिरांनीही ‘सबकी भूल कमल का फूल’ अशा घोषणा दिल्या.

Web Title: Conspiracy to destroy small traders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.