'...पण, खान्देशातील नेतृत्व संपविण्याचे षड्यंत्र', खडसेंचा विरोधकांवर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2021 12:44 PM2021-08-29T12:44:05+5:302021-08-29T12:44:57+5:30
Eknath Khadse : मुक्ताईनगर येथील निवासस्थानी रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत एकनाथ खडसे बोलत होते.
मुक्ताईनगर (जि. जळगाव) : सक्त वसुली संचालनालयाच्या (ईडी) चौकशीवर परिणाम होईल, असे आपण बोलणार नाही. परंतु खान्देशातील नेतृत्व संपविण्याचे षड्यंत्र रचले जात आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी विरोधकांवर केला आहे. तसेच, सक्त वसुली संचालनालयाने आपली संपत्ती जप्त नाही तर अॅटॅच केल्याचे ते म्हणाले.
मुक्ताईनगर येथील निवासस्थानी रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत एकनाथ खडसे बोलत होते. ते म्हणाले की, ५० वर्षापूर्वी आपल्याकडे ६० एकर जमीन वडिलोपार्जित आहे. ४० वर्षात आपण इतकी विकास कामे केली आहेत की आपल्या पासंगालाही कुणी पुरणार नाही.
याचबरोबर, जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी सर्वपक्षीय पॅनल उभे करण्यात येईल, असेही एकनाथ खडसे म्हणाले. दरम्यान, पुणे येथील भोसरी एमआयडीसी भूखंड खरेदी गैरव्यवहार प्रकरणी सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) एकनाथ खडसे यांची लोणावळा आणि जळगाव येथील ५ कोटींहून अधिकची मालमत्ता जप्त केली आहे.
एकनाथ खडसेंवर असलेल्या आरोपानुसार २०१६ मध्ये महसूलमंत्री असताना खडसे व त्यांचा जावई गिरीश चौधरी यांनी पुण्यातील भोसरी येथील एक भूखंड विकत घेतला. याचा बाजारभाव ३१ कोटी असताना गिरीश यांनी तो अवघ्या तीन कोटींना विकत घेतला. हा भूखंड एमआयडीसीच्या मालकीचा होता. इतक्या कमी किमतीत व्यवहार कसा झाला? गिरीश यांनी तो विकत घेण्यासाठी गोळा केलेल्या तीन कोटी रुपयांचा स्रोत काय? याबाबत ‘ईडी’ चा तपास सुरू आहे.
ठेवीही गोठविल्या
एकनाथ खडसे यांच्या ५ कोटी ७३ लाखांच्या मालमत्तेवर टाच आणताना ईडीने खडसे यांचा लोणावळा येथील बंगला, जळगाव येथील तीन जमिनी आणि तीन फ्लॅट जप्त केले आहेत. तसेच, बँकेतील ८६ लाखांच्या ठेवीसुद्धा गोठविल्या आहेत, अशी माहिती मिळते आहे.