हे तर सपा-भाजपाचे कारस्थान
By admin | Published: May 9, 2014 01:14 AM2014-05-09T01:14:34+5:302014-05-09T01:14:34+5:30
वाराणशीत ‘रॅली’साठी परवानगी नाकारल्याच्या कारणावरून सुरू झालेल्या वादावर बसपा अध्यक्ष मायावती यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे
लखनौ : वाराणशीत ‘रॅली’साठी परवानगी नाकारल्याच्या कारणावरून सुरू झालेल्या वादावर बसपा अध्यक्ष मायावती यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ऐन मतदानाच्या तोंडावर वाराणशीतील वातावरण खराब करण्यासाठी समाजवादी पक्ष व भाजपाने एकत्रितपणे केलेले हे षड्यंत्र आहे. धार्मिक तणाव निर्माण व्हावा यासाठी मोदी यांना बेनियाबाग येथे सभेची परवानगी नाकारण्यात आली असा आरोप मायावती यांनी लावला आहे. १२ मे रोजी लोकसभा निवडणुकांचा अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात राजकीय लाभ घेण्यासाठी भाजपाकडून ही चाल खेळण्यात आली आहे. वाराणशीच्या वातावरणाला हिंदू-मुस्लीम रंग देऊन आझमगढ येथेदेखील फायदा करून घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. वाराणशीतून मोदी तर आझमगढ येथून समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव निवडणूक लढत आहेत. समाजवादी पक्षाच्या सरकारनेच भाजपाला निवडणूक आयोगाच्या विरुद्ध धरणे आंदोलन करण्याची संधी दिली. भाजपा वाराणशीत तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे अन् सपाकडून त्यांना मदत करण्यात येत आहे, असे प्रतिपादन मायावती यांनी केले. यावेळी मायावती यांनी प्रशासकीय अधिकार्यांवरदेखील टीका केली. काही अधिकारी राजकीय पक्षांना लाभ मिळावा यासाठी जाणूनबुजून राजकीय वातावरण तापविण्यासाठी हे नाटक करीत आहेत. जर सुरक्षेसंदर्भात मोदी यांना काही धोका आहे तर त्यासाठी योग्य ती व्यवस्था करणे ही समाजवादी पक्षाच्या शासनाची जबाबदारी आहे. परंतु षड्यंत्र असल्याने सरकारने हात झटकले आहेत. म्हणूनच तर सपा नेते मोदी यांच्या सुरक्षेची जबाबदारी निवडणूक आयोगाची असल्याचे वक्तव्य करत आहे असे मायावती म्हणाल्या.