"माझ्यावर हल्ला करण्याचं षडयंत्र, परंतु त्याचं टायमिंग चुकले अन्...; सदाभाऊंचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2022 02:26 PM2022-06-17T14:26:21+5:302022-06-17T14:31:07+5:30
राष्ट्रवादीकडून सतत होणाऱ्या हल्ल्याबाबत आपण याबाबत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तसेच विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस ह्यांच्याकडे चौकशीची मागणी करून खऱ्या सूत्रधाराचा चेहरा जनतेसमोर आणणार असल्याचे सदाभाऊ पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
मुंबई - रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्या सांगोला दौऱ्यावेळी गोंधळ घडला. पंचायत समितीच्या कार्यक्रमात गेलेल्या खोत यांना एका हॉटेल मालकानं अडवलं. २०१४ मध्ये खोत यांच्या कार्यकर्त्यांनी हॉटेलचं बिल थकवल्याचा आरोप त्यांनी केला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला त्यानंतर आता सदाभाऊ खोत यांनी वेगळाच दावा केला आहे.
सदाभाऊ खोत म्हणाले की, ज्या व्यक्तीनं मला अडवले त्याला विचारलं असता, त्या व्यक्तीने २०१४ साली लोकसभा निवडणुकीदरम्यान आपले कार्यकर्ते माझ्या हॉटेलात जेवून गेले मात्र अद्याप बिलाची रक्कम चुकती केलेली नाही अशी अस्पष्ट आणि अपुरी माहिती पुरवली. खोलवर विचारणा केली असता सदर व्यक्तीने आपलं नाव अशोक शिनगारे असल्याचं सांगितलं. मात्र ह्याबाबत कोणतीही ठोस माहिती तो देऊ शकला नाही. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान माझा कोणताही कार्यकर्ता अथवा प्रचारक साधा हॉटेलात चहासुद्धा पित नव्हता कारण आमच्याकडे पैसे नव्हते. मग हजारो रुपयांचं हॉटेलचं बिल होणं अशक्य आहे असं सांगत त्यांनी आरोप फेटाळून लावला.
त्याचसोबत असं काहीतरी कुंबाड रचायचं आणि त्यानंतर हल्ला करायचा असा त्यांचा एकंदरीत प्लॅन होता. परंतु त्याचं टायमिंग चुकले आणि आम्ही लवकर आलो. तो बराच वेळ नुसताच कुबांड रचून एकच गोष्ट दहा वेळा सांगत होता. हल्ला करायला लोक येणार होते ते लवकर येत नव्हते, त्यामुळे त्याला जी स्क्रिप्ट दिली होती ती पुन्हा पुन्हा सांगत होता. म्हणून हा हल्ला का झाला तर भाऊंनी पैसे दिले नाहीत म्हणून या कार्यकर्त्यांनी सदाभाऊवर हल्ला केला असे त्यांना चित्र महाराष्ट्रभर घालवायचं होतं. ह्या घटनेमागची सत्यता पडताळता डोळ्यासमोर जे आलं ते मात्र अवस्थ राजकीय वातावरणातून कुणीतरी केलेलं षडयंत्र असल्याचा दावा सदाभाऊ खोत(Sadabhau Khot) यांनी केला.
बिलाचे पैसे कधी देणार?; हॉटेलमालकाने सदाभाऊंना रस्त्यात अडवलं, नेमकं काय घडलं?
अडवणाऱ्या व्यक्तीची गुन्हेगारी पार्श्वभूमी - खोत
राष्ट्रवादीच्या टॉमोटोसारख्या गालांच्या नेत्याच्या सांगण्यावरून हा हॉटेल मालक बनाव करत असल्याचं सांगत ह्या व्यक्तीच्या गुन्हयाचा पाढाच खोत यांनी मिडिया समोर वाचला. ३/४/२०२१ रोजी लिमिटेशन ऍक्ट खाली आणखी एक गुन्हा दाखल आहे. महाकाली सहकारी साखर कारखाना कवठे महाकाळ चा IPC १३८ खाली गुन्हा दाखल आहे. जयहिंद पतसंस्थेचा IPC १३८ खाली गुन्हा दाखल आहे. असे तब्बल सहा सात गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. तो वाळूमाफिया आहे. तो दारूविक्रेता आहे ही सगळी माहिती समोर आली. हा राष्ट्रवादीचा भामट्या एवढयावरच थांबला नसून त्याने सिद्धू शिंदे, रा. काळेवाडी, ता आटपाडी, जि. सांगली यांच्या बंगळुरू येथील सोन्याच्या दुकानातून १४ किलो सोने चोरल्याबद्दल देखील गुन्हा नोंद आहे. अशा व्यक्तीची कसून चौकशी करून त्याची मागील गुन्हेगारी प्रवृत्ती तपासून त्यावर तात्काळ कारवाई करावी. परंतु पोलीस देखील गुन्हा नोंद करायला तयार नसल्याचे लक्षात आल्यावर त्याच्या मागे कुणाचा तरी हात आहे असा आरोप सदाभाऊंनी केला.
खरा चेहरा जनतेसमोर आणणार
राष्ट्रवादीकडून सतत होणाऱ्या हल्ल्याबाबत आपण याबाबत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तसेच विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस ह्यांच्याकडे चौकशीची मागणी करून खऱ्या सूत्रधाराचा चेहरा जनतेसमोर आणणार असल्याचे सदाभाऊ पत्रकारांशी बोलताना म्हणाले. तसेच राष्ट्रवादी पक्ष आणि पवार कुटुंबीयांकडून मला धोका आहे. "तुम्ही असे हल्ले करून आणि कुबांड रचून आम्हाला जीवनातून उठवू शकत नाही." हा संघर्ष आता तीव्र होईल आणि गावगाड्यातील माणसांना एकत्र घेऊन ह्याचं जशास तसं उत्तर दिलं जाईल. गुन्हेगारांना पुढे घालून जर हल्ला कराल तर सदाभाऊ खोत त्याच्या बापांचा बाप आहे. भविष्यात "आरे ला कारे" म्हणूनच उत्तर दिले जाईल, असा इशारा सदाभाऊ खोत यांनी विरोधकांना दिला.