फडणवीसच नव्हे, तर अन्य भाजप नेत्यांना तुरुंगात डांबण्याचे षडयंत्र; भाजप कार्यकारिणीत मविआवर हल्लाबोल
By यदू जोशी | Published: February 11, 2023 01:22 PM2023-02-11T13:22:56+5:302023-02-11T13:23:27+5:30
मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त संजय पांडे यांना आपल्या अटकेची सुपारी देण्यात आली होती असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केला होता.
नाशिक : केवळ देवेंद्र फडणवीस यांनाच नव्हे तर भाजपच्या अन्य नेत्यांनाही खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवून तुरुंगात डांबण्याचे षडयंत्र मविआ सरकारच्या काळात रचण्यात आले होते असा गौप्यस्फोट भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत मांडलेल्या राजकीय ठरावात शुक्रवारी करण्यात आला.
शनिवारी होणाऱ्या खुल्या बैठकीत राजकीय तसेच सहकार व कृषी विषयक असे दोन ठराव मंजूर करण्यात येणार आहेत. प्रदेश पदाधिकारी व जिल्हाध्यक्षांच्या आजच्या बैठकीत आलेल्या राजकीय ठरावात, कांगावे करणारे, टोमणे मारणारे, सुडाच्या भावनेने काम करणारे आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी गद्दारी करणारे सरकार आम्ही घालविले आणि एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील हिंदुत्ववादी सरकार आणले असा हल्लाबोल करण्यात आला आहे.
मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त संजय पांडे यांना आपल्या अटकेची सुपारी देण्यात आली होती असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केला होता. राजकीय ठरावात महाराष्ट्राच्या इतिहासाला काळिमा फासणाऱ्या या सूडपर्वाचा कार्यकारिणी निषेध करते असे ठरावात म्हटले आहे. महाविकास आघाडीने संविधानाची शपथ घेण्याचा दिखावा केला होता. सरकार चालविताना मात्र त्या तत्त्वांना हरताळ फासला. सत्तेचा वापर दडपशाही आणि सुडासाठी केला. सरकारी वकिलाला हाताशी धरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना अडकविण्याचे प्रयत्न झाले होते, असे स्पष्ट आरोप ठरावात आहेत. कोणत्या भाजप नेत्यांना मविआ सरकारच्या काळात जेलमध्ये टाकण्याचे प्रयत्न झाले होते यावर प्रकाश पडणार का? याबाबत उत्सुकता आहे. फडणवीस यांना तुरुंगात डांबण्यासाठी मुंबईच्या तत्कालीन पोलिस आयुक्तांना सर्वोच्च पातळीवरून जबाबदारी देण्यात आली होती, असे ठरावात नमूद केले आहे.
इतिहासावरुन टीका
- राजकीय ठरावात असेही म्हटले आहे की, शिंदे-फडणवीस सरकारमुळे हिंदुत्वाच्या विचारांना सन्मान मिळत आहे. तथापि विरोधकांकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या देदीप्यमान इतिहासाची मतांच्या राजकारणासाठी सोयीस्कर मांडणी केली जात आहे.त्यातूनच छत्रपती संभाजी महाराज यांना धर्मवीर म्हणू नका असे आवाहन करण्यापर्यंत मजल गेली आहे.
- काही लोक शाहिस्तेखान, अफजल खान होते म्हणून शिवाजी महाराज होते इतका टोकाचा अनुनय करण्याच्या मागे लागले असून ही वृत्ती वेळीच रोखण्याची गरज असल्याचे राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचे नाव न घेता ठरावात म्हटले आहे.
- शिंदे-फडणवीस सरकारने घेतलेल्या अनेक निर्णयांचा उल्लेख करत ठरावात सरकारची प्रशंसा करण्यात आली आहे.
विरोधकांकडून दिशाभूल
- राज्यातील जनतेने २०१९ मध्ये दिलेल्या जनादेशाचा सन्मान आमचे सरकार आल्यामुळे झाला. विरोधक मात्र भ्रम पसरवत आहेत.
- औद्योगिक गुंतवणुकीपासून विविध मुद्द्यांवर दिशाभूल करणाऱ्या महाविकास आघाडीपासून सावध राहा असे आवाहन या ठरावात करण्यात आले आहे.
- मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, दोन्ही समाजांना सरकारने दिलेल्या सोयीसुविधांचा उल्लेखही ठरावात आहे.