‘माझ्या बदनामीसाठी ‘त्या’महिलांनी रचले षड्यंत्र’
By Admin | Published: March 14, 2016 02:38 AM2016-03-14T02:38:13+5:302016-03-14T02:38:13+5:30
हिंदुत्ववाद्यांशी आर्थिक व्यवहार करून दुर्गा शुक्रे यांनी माझ्या बदनामीचे षड्यंत्र रचल्याचा आरोप भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी केला आहे.
नाशिक : हिंदुत्ववाद्यांशी आर्थिक व्यवहार करून दुर्गा शुक्रे यांनी माझ्या बदनामीचे षड्यंत्र रचल्याचा आरोप भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी केला आहे. त्र्यंबकेश्वर देवस्थानशी वाटाघाटी करणाऱ्या ‘त्या’ महिलांचा ब्रिगेडशी कोणताही संबंध नसून, त्यांची १० फेब्रुवारीला संघटनेतून हकालपट्टी केल्याचा दावाही देसाई यांनी केला आहे.
त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात महिलांना प्रवेश देण्याच्या मागणीसाठी देसाई यांच्या नेतृत्वाखाली ७ मार्चला आंदोलन झाले. त्याला त्र्यंबकेश्वरवासियांनी तीव्र विरोध केला होता. पोलिसांनी देसाई यांना जिल्ह्याच्या हद्दीवरच रोखल्याने संघर्ष टळला होता. मात्र देसाई यांनी त्र्यंबक देवस्थानसमवेत बैठक बोलावण्यासाठी दहा दिवसांची मुदत जिल्हा प्रशासनाला दिली होती. शनिवारी भूमाता ब्रिगेडच्या दुर्गा शुक्रे, पुष्पक केवाडकर, प्रियंका जगताप आदिंनी त्र्यंबकेश्वर देवस्थानमध्ये बैठक घेऊन देसाई यांची भूमाता ब्रिगेडमधून हकालपट्टी केल्याचे वक्तव्य केले होते. गाभाऱ्यात महिलांना प्रवेश देण्याचा निर्णय धर्मसंसद घेईल, असा निर्णयही बैठकीत घेण्यात आला होता.
त्या पार्श्वभूमीवर देसाई यांच्याशी ‘लोकमत’ने संपर्क साधल्यावर त्यांनी भूमिका स्पष्ट केली. त्र्यंबक देवस्थानसमवेत बैठक बोलावण्यासाठी १८ मार्चची मुदत दिली आहे. बैठक न झाल्यास १९ मार्चला मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करू, असा इशाराही देसाई यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)