कॉन्स्टेबलसह पत्नी, भावाविरुद्ध गुन्हा
By Admin | Published: April 7, 2017 01:48 AM2017-04-07T01:48:10+5:302017-04-07T01:48:10+5:30
पोलीस कॉन्स्टेबल संतोष कदम याच्याविरुद्ध भोईवाडा पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.
मुंबई : बलात्कारित तरुणीला सहकारी पोलिसाविरुद्ध तक्रार न करण्यासाठी वारंवार धमकाविल्याप्रकरणी अखेर पोलीस कॉन्स्टेबल संतोष कदम याच्याविरुद्ध भोईवाडा पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. त्याची पत्नी व पोलीस उपनिरीक्षक असलेल्या भावाने पीडित तरुणीला पोलीस ठाण्यातच जिवंत जाळण्याची धमकी दिल्याबाबत त्यांच्याविरुद्धही ‘एनसी’ नोंदविण्यात आली आहे.
कॉन्स्टेबल तुषार तिऊरवडे याच्या अटकपूर्व जामिनावर सोमवारी सत्र न्यायालयात सुनावणी होईल. पतीपासून विभक्त असलेल्या तरुणीला आमिष दाखवित तिऊरवडेने शारीरिक संबंध ठेवले होते. ती गर्भवती राहिल्यानंतर मारहाण करून तिचा गर्भपात केला. पीडित तरुणीच्या तक्रारीवर वरिष्ठांकडून कोणतीच कारवाई होत नसल्याचे वृत्त ‘लोकमत’ने २७ फेबु्रवारीला दिले. त्यानंतर गुन्हा अन्वेषण शाखेकडून चौकशी होऊन २४ मार्चला भोईवाडा पोलीस ठाण्यात तिऊरवडेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. कदम याची पत्नी व त्याचा भाऊ पोलीस उपनिरीक्षक कदम पोलीस ठाण्यात आला होता. तुला जिवंत जाळीन, असे कदमच्या पत्नीने तरुणीला धमकाविले होते. तरुणीने आयुक्त व नियंत्रण कक्षाला फोन करून हा प्रकार कळविला होता. त्यांच्या सूचनेनुसार स्वतंत्र तक्रार अर्ज दिला. मात्र, गुन्हा दाखल करण्यात चालढकल होत होती. बुधवारी तरुणीने परिमंडळ-४च्या उपायुक्त अंबिका यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी वरिष्ठ निरीक्षक पाटील यांना खडसावित तक्रार दाखल करण्याची सूचना केली. तिऊरवडेवरील कारवाईत होणाऱ्या विलंबाबाबत पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांना विचारले असता, त्यांनी हा गंभीर विषय आहे. पोलीस कर्मचाऱ्याला कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घातले जाणार नाही, असे स्पष्ट केले. (प्रतिनिधी)