'ड्यूटी' संपल्यानंतरही 'कर्तव्य' बजाविणारा कॉन्स्टेबल ठार
By admin | Published: September 15, 2016 12:04 PM2016-09-15T12:04:11+5:302016-09-15T12:32:43+5:30
ड्यूटी संपवून घरी परतताना रस्त्यावरील अपघातस्थळी स्वत:हून कर्तव्य बजाविणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबलला लक्झरी बसने उडविले
Next
>ऑनलाइन लोकमत
साताऱ्यानजीक विचित्र अपघातात वाहतूक पोलिसासह होमगार्ड जखमी
सातारा, दि. 15 - ड्यूटी संपवून घरी परतताना रस्त्यावरील अपघातस्थळी स्वत:हून कर्तव्य बजाविणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबलला लक्झरी बसने उडविले. पुणे- बंगळुरु महामार्गावरील रायगावनजीक घडलेल्या या विचित्र अपघातात एक कॉन्स्टेबल ठार तर वाहतूक पोलिसासह होमगार्ड कर्मचारी जखमी झाला.
भुईंज पोलिस ठाण्यातील पोलिस नाईक नितिन जमदाडे (वय 35, मूळ रा. ओझर्डे) आपली ड्यूटी संपवून मध्यरात्री सातारला घरी निघाले होते, पण वाटेत रायगाव फाटा येथे अपघात झाल्याचे पाहून थांबले. कंटेनर आणि कारमध्ये झालेल्या अपघातातील वाहने बाजूला काढत वाहतूक सुरळीत करु लागले. त्याचवेळी पुण्याकडे निघालेल्या लक्झरी बसने त्यांना ठोकर दिली. या विचित्र अपघातात जमदाडे, वाहतूक पोलिस कॉन्स्टेबल अमोल कांबळे आणि एक होमगार्ड असे तिघेजण जखमी झाले. जमदाडे यांच्यावर उपचार सुरु असताना पहाटे सातारा हॉस्पिटलमध्ये त्यांचा मृत्यू झाला. इतर जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
ड्यूटी संपलेली असतानाही आपल्या कर्तव्यापासून दूर न जाता काम करणाऱ्या जमदाडे यांच्यावर काळाने घातलेला घाला साताऱ्याच्या पोलिस खात्यासाठी धक्कादायक ठरला आहे. दोनच दिवसांपूर्वी विलास शिंदे यांच्या तेराव्याला त्यांच्या आईचे निधन झाले होते तर बंदोबस्ताची ड्यूटी बजावून घरी परतताना सूर्यकांत सावंत यांचाही हृदयविकाराने मृत्यू झाला होता. त्या दोन धक्क्यातून सावरतो ना सावरतो तोच तिसरा धक्का सातारा पोलिसांना बसला आहे. आज गणेश विसर्जन सोहळ्याचा बंदोबस्त असतानाही अनेक पोलिस अधिकाऱ्यांची जमदाडे यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थिती लावली. शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.