डमी बसवून पास झालेले कॉन्स्टेबल ट्रेनिंगला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 03:28 AM2018-01-22T03:28:11+5:302018-01-22T03:30:25+5:30
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत डमी उमेदवार बसवून उत्तीर्ण झालेले दोघे कॉन्स्टेबल नाशिकच्या पोलीस अकादमीमध्ये प्रशिक्षण घेत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. नांदेड येथील बनावट नोकरभरतीत अटक केलेल्या एका पोलीस अधिका-याच्या जबाबातून ही माहिती पुढे आली.
मुंबई :महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत डमी उमेदवार बसवून उत्तीर्ण झालेले दोघे कॉन्स्टेबल नाशिकच्या पोलीस अकादमीमध्ये प्रशिक्षण घेत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. नांदेड येथील बनावट नोकरभरतीत अटक केलेल्या एका पोलीस अधिका-याच्या जबाबातून ही माहिती पुढे आली.
धनंजय रामभाऊ फरतडे (बक्कल क्रमांक १३६८) व नरेंद्र नारायणराव नाईक (क्रमांक २०७६) हे दोघे नागपूर ग्रामीण पोलीस दलात उपनिरीक्षक म्हणून भरती झाले आहेत. १५ दिवसांपासून ते प्रशिक्षण घेत आहेत. दोन वर्षांपूर्वी मांडवी (नांदेड) येथे स्पर्धा परीक्षेमध्ये डमी उमेदवार बसविणे, खोटे दस्तऐवज तयार करणा-यांचे रॅकेट उघडकीस आले होते. राज्य गुन्हा अन्वेषण विभागाने (सीआयडी) अटक केलेल्या साहाय्यक निरीक्षक सोमनाथ पारवे-पाटील याने घोटाळ््याची कबुली दिली. २०१६ च्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या ८२८ उमेदवारांचे ५ जानेवारीपासून नाशिकला ९ महिन्यांचे प्रशिक्षण सुरू झाले आहे. त्यात फरतडे व नाईक सहभागी झाले आहेत. सीआयडीचे तपास पथक त्यांची चौकशी करणार आहेत.
भरतीचे रॅकेट-
मांडवी येथे प्रफुल्ल राठोड याने एक संस्था स्थापन करुन डमी उमेदवार पुरविले होते. तो तरुणांकडून लाखो रुपये उकळीत होता. नागपूरचे साहाय्यक निरीक्षक सोमनाथ पारवे-पाटील, सोलस्कर यांच्यासह अन्य एक अधिकारी डमी उमेदवार म्हणून परीक्षा द्यायचे. या टोळीच्या मदतीने अनेक उमेदवार उत्तीर्ण झाल्याचे तपासातून पुढे आले आहे.