‘त्या’ कॉन्स्टेबलचा जामीन अर्ज फेटाळला

By admin | Published: April 27, 2017 02:20 AM2017-04-27T02:20:06+5:302017-04-27T02:20:06+5:30

बलात्कार व भू्रणहत्या प्रकरणी गुन्हा दाखल असलेला पोलीस कॉन्स्टेबल तुषार तिऊरवडे याला अटक करण्याचा पोलिसांचा मार्ग आता मोकळा

The Constable's bail application is rejected | ‘त्या’ कॉन्स्टेबलचा जामीन अर्ज फेटाळला

‘त्या’ कॉन्स्टेबलचा जामीन अर्ज फेटाळला

Next

मुंबई : बलात्कार व भू्रणहत्या प्रकरणी गुन्हा दाखल असलेला पोलीस कॉन्स्टेबल तुषार तिऊरवडे याला अटक करण्याचा पोलिसांचा मार्ग आता मोकळा झाला आहे. त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायालयाने बुधवारी फेटाळून लावला. त्यामुळे सायन पोलीस त्याला केव्हा अटक करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तिऊरवडेविरुद्ध २४ मार्चला बलात्कार व भू्रणहत्येचा गुन्हा दाखल आहे. अटक टाळण्यासाठी त्याने न्यायालयात धाव घेतली होती. त्याबाबत तीनवेळा सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने बुधवारी त्याबाबत निकाल दिला. पतीपासून विभक्त राहत असलेल्या एका तरुणीला घटस्फोट मिळवून देतो, तसेच तिला लग्नाचे आमिष दाखवून त्याने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यातून ती गर्भवती राहिल्यानंतर मारहाण करुन गर्भपात करून घेतला. याबाबत तक्रार देऊनही पोलिसांकडून कारवाई होत नव्हती. ‘लोकमत’ने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर आयुक्तांनी गुन्हे शाखेकडे तपास सोपविला. त्यांच्या चौकशीनंतर भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन सायन पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.
पीडितेला हे प्रकरण मिटविण्यासाठी धमकाविणाऱ्या कॉन्स्टेबल संतोष कदम याची पत्नी व उपनिरीक्षक असलेल्या भावाविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, तिऊरवडेचा अटकपूर्व जामीन फेटाळल्याने त्याला लवकरच अटक करण्यात येईल, असे सायन पोलीस ठाण्यातील वरिष्ठ निरीक्षक मृदला लाड यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: The Constable's bail application is rejected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.