कॉन्स्टेबलचे गोपनीय अहवाल निरीक्षक लिहिणार
By admin | Published: July 10, 2017 05:35 AM2017-07-10T05:35:12+5:302017-07-10T05:35:12+5:30
वार्षिक गोपनीय अहवाल, (एसीआर) आता त्यांचे तत्काळ प्रमुख असलेल्या पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून लिहिले जाणार आहेत.
जमीर काझी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पोलिसांना पदोन्नती, नियुक्ती आणि पदक निवडीसाठी महत्त्वाचे ठरत असलेले त्यांचे वार्षिक गोपनीय अहवाल, (एसीआर) आता त्यांचे तत्काळ प्रमुख असलेल्या पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून लिहिले जाणार आहेत. संबंधित पोलीस उपअधीक्षक, सहायक आयुक्त आणि उपायुक्त व अधीक्षक अन्य कामाच्या व्यस्ततेमुळे या कामाची पूर्तता होत नसल्याने, हा बदल करण्यात आला आहे.
या निर्णयामुळे पावणे दोन लाखांवर संख्या असलेले कॉन्स्टेबल ते सहायक फौजदारांचे प्रलंबिंत राहणारे ‘एसीआर’ मार्गी लागणार आहेत. या कामाची १०० टक्के पूर्तता दरवर्षी ३१ मार्चपूर्वी करून घेण्याची जबाबदारी पोलीस घटकप्रमुखांवर राहणार आहे. पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी तसे आदेश सर्व घटकप्रमुखांना दिले आहेत.
सतत बंदोबस्तावर असणाऱ्या पोलिसांच्या कामगिरीचे मूल्यमापन, हे त्यांच्या वार्षिक गोपनीय अहवालावर निश्चित होत असते. या आर्थिक वर्षापासून पोलीस कॉन्स्टेबल (शिपाई) व नाईक यांचे शीट रिमार्क हे ते कार्यरत असलेल्या पोलीस ठाणे,शाखेतील प्रमुख निरीक्षकांकडून लिहिले जातील.
अंमलदारांची संख्या
पदसंख्या
कॉन्स्टेबल-९०,२८७
नाईक-४१,०७९
हवालदार४१,०१५
सहायक फौजदार१७,८६०