समायोजनासाठी समिती गठित
By admin | Published: November 2, 2016 04:44 AM2016-11-02T04:44:48+5:302016-11-02T04:44:48+5:30
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन (एनआरएचएम) मध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांच्या समायोजनासाठी समिती गठित करण्याचा निर्णय आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी घेतला
अमरावती : केंद्र सरकारच्या अनुदानातून राज्यात सुरू असलेल्या राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन (एनआरएचएम) मध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांच्या समायोजनासाठी समिती गठित करण्याचा निर्णय आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी घेतला आहे. याकरिता आ. बच्चू कडू यांनी पुढाकार घेतला, हे विशेष.
‘एनआरएचएम’च्या कर्मचाऱ्यांची आरोग्य सेवा मार्च २०१७ नंतर बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे गत १० ते १५ वर्षांपासून कार्यरत कर्मचाऱ्यांवर बेकारीची टांगती तलवार होती.
याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी दिवाळीच्या पूर्वसंध्येला आ. बच्चू कडूंच्या नेतृत्वात मुंबईत आझाद मैदानावर भव्य मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनासाठी राज्यस्तरीय समिती गठित करण्याचा निर्णय आरोग्यमंत्री सावंत यांनी घेतला.
यामुळे शासन तिजोरीवर कोणताही भार पडणार नाही. परंतु राज्य सरकारने कुचराई केल्यास केंद्र सरकारला जागे करण्यासाठी दिल्लीत मोर्चा काढू, असा इशारा कडू यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)
>१८ हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांचे भवितव्य अधांतरी
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशनमध्ये सन २००५ पासून विविध संवर्गात १८ हजार कर्मचारी करार तत्त्वावर कंत्राटी कर्मचारी तथा ६५ हजार आशा सेविका, ३५०० गट प्रवर्तिका गावपातळीवर कार्यरत आहेत. परंतु सदर अभियान केंद्र सरकार मार्च २०१७ पासून गुंडाळण्याची तयारी सुरू आहे.