चित्रपट महामंडळाची घटनादुरुस्ती
By admin | Published: June 20, 2016 12:50 AM2016-06-20T00:50:37+5:302016-06-20T00:50:37+5:30
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त घटनेमध्ये सदस्यत्व नोंदणी, नूतनीकणापासून निवडणूक प्रक्रियेपर्यंतचे अनेक बदल करण्याची गरज संचालक
पुणे : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त घटनेमध्ये सदस्यत्व नोंदणी, नूतनीकणापासून निवडणूक प्रक्रियेपर्यंतचे अनेक बदल करण्याची गरज संचालक मंडळाच्या बैठकीत व्यक्त करण्यात आली. महामंडळाची घटना १९७० मध्ये तयार करण्यात आली होती. घटनादुरुस्तीच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांना सामावून घेण्याचा महामंडळाचा प्रयत्न आहे. त्यासाठी घटना समिती नेमण्यात आली असून समितीची पहिली बैठक दि. २१ जून रोजी होणार आहे. आॅगस्टमध्ये होणाऱ्या सर्वसाधारण सभेत घटनादुरुस्तीला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. सप्टेंबर महिन्यापासून घटनादुरुस्ती लागू करण्यात येईल, अशी माहिती अध्यक्ष मेघराजे राजेभोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
संचालक मंडळाच्या पहिल्या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या बैठकीला महामंडळाचे उपाध्यक्ष धनाजी यमकर, खजिनदार संजय ठुबे, वर्षा उसगावकर, निकिता मोघे, चैत्राली डोंगरे, विजय खोचीकर, शरद चव्हाण, अण्णा देशपांडे, पितांबर काळे, सतीश रणदिवे, रवींद्र बोरगावकर, विशाल पवार, मनोज कुलकर्णी आदी उपस्थित होते.
राजेभोसले म्हणाले, ‘घटना सत्तरच्या दशकात तयार केली. त्यामध्ये कालानुरूप बदल करण्याची गरज आहे. यामध्ये सदस्यत्वापासून निवडणूक प्रक्रियेतील बदलांचाही समावेश आहे. दुरुस्तीच्या प्रस्तावाला संचालक मंडळाने मान्यता दिली आहे. नवीन घटना लवकरच तयार करण्यात येणार आहे.’ (प्रतिनिधी)