"डॉ. आंबेडकर, देश संकटात आहे; राज्यघटनेचं अवमूल्यन आज केलं जातंय"

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2022 08:45 AM2022-12-06T08:45:05+5:302022-12-06T08:49:53+5:30

देशात आणि राज्यात सुरू असलेल्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करत शिवसेनेकडून राज्य आणि केंद्र सरकारवर निशाणा साधण्यात आला आहे.

"Constitution is being devalued today; Dr. Ambedkar, the country is in trouble'', Says shivsena on central and state government polity | "डॉ. आंबेडकर, देश संकटात आहे; राज्यघटनेचं अवमूल्यन आज केलं जातंय"

"डॉ. आंबेडकर, देश संकटात आहे; राज्यघटनेचं अवमूल्यन आज केलं जातंय"

Next

मुंबई - कोरोनाच्या दोन वर्षांच्या कालखंडानंतर यावर्षी दादार चैत्यभूमीवर दाखल अनुयायांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी लाखोंचा जनसागर उसळला आहे. सोशल मीडिया आणि गावा-गावातून महामानवाच्या स्मृतींना उजाळा देण्यात येत आहे. राज्यघटनेचे शिल्पकार, संविधानविधाता अशा उपाध्यांनी बाबासाहेबांच्या कार्याची महती सांगण्यात येत आहे. मात्र, सध्या देशात आणि राज्यात सुरू असलेल्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करत शिवसेनेकडून राज्य आणि केंद्र सरकारवर निशाणा साधण्यात आला आहे. डॉ. आंबेडकर, देश संकटात आहे, या मथळ्याखाली शिवसेनेनं  राज्यकर्त्यांवर टीका केलीय.

शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रातील अग्रलेखातून पंतप्रधान नरेंद्र मोदींसह राज्य सरकारवर शिवसेनेनं जबरी टीका केलीय. तसेच, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हे देशाचे मार्गदर्शक होते, त्यांनी मुस्लीम धर्म स्विकारला नाही, हेच हिंदुंवर मोठे उपकार होते, अशा शब्दात बाबासाहेबांची महती स्पष्ट केली आहे.  

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 67 वा महापरिनिर्वाण दिन. देशाच्या कानाकोपऱ्यांतून या महामानवास आज श्रद्धांजली अर्पण केली जाईल. मुंबईतील चैत्यभूमीवर तर त्यांच्या अनुयायांचा महासागर उसळेल. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमीच सांगत, 'महाराष्ट्राची दोनच दैवते खरी. पहिले शिवाजी महाराज व दुसरे डॉ. बाबासाहेब आंबेडकर.' मात्र या दोन्ही दैवतांचा आज राजकारणापुरता वापर करण्याचे तंत्र सध्याच्या राज्यकर्त्यांनी अवलंबिले आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला राज्यघटना दिली. त्यात लोकशाही, स्वातंत्र्य सगळेच आले. लोकशाही म्हणजे संवाद. शासन आणि जनता यांच्यातील संवाद, म्हणजेच खरीखुरी लोकशाही. बहुसंख्याक आणि अल्पसंख्याक यांच्यातील संवाद लोकशाहीला अभिप्रेत आहे. ज्यांचे सरकारशी चांगले जमते आणि ज्यांची मतभिन्नता आहे त्यांच्यात संवाद व्हायलाच हवा. मात्र केवळ ज्यांच्याकडे बहुमत आहे त्या बहुमतवाल्यांचे शासन म्हणजे लोकशाही नव्हे. लोकशाहीमध्ये बहुमतवाल्यांच्या शासनाला विरोधकांची गर्भित व उघड संमती आवश्यक असते. म्हणूनच विरोधकांचा आवाज बंद पाडून तुम्ही त्यांना नष्ट करू शकत नाही. ख्यातनाम ब्रिटिश विचारवंत हेरॉल्ड लास्की म्हणतात, 'आपल्या समर्थकांच्या स्तुतीपेक्षा टीकेतून सरकार अधिक शहाणे होत असते.' डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली, त्या घटनेने हे सर्व अधिकार व स्वातंत्र्य आपल्याला दिले. पण त्याच घटनेचे अवमूल्यन आज केले जात आहे व घटनेने दिलेल्या स्वातंत्र्यास पायदळी तुडवले जात आहे. अशा वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची आठवण येते, असे म्हणत शिवसेनेनं राज्यकर्त्यांवर निशाणा साधला आहे.  

नफेखोरांचे राज्य चालले आहे

एका महान उदात्त हेतूने बाबासाहेबांनी भारतीय राज्यघटना तयार केली. पण ती अंमलबजावणीसाठी चुकीच्या लोकांच्या हातात गेली तर नुकसान होईल, असाही डॉ. आंबेडकरांनी तेव्हा इशारा दिला होता. आज त्यांची आठवण येते. त्यांनी प्रखर सत्य सांगितले होते. डॉ. आंबेडकर त्याचवेळी म्हणाले होते की, 'या देशात दगडाला शेंदूर लावणे सोपे आहे, पण नंतर तो उरवडून काढणे कठीण आहे.' आज अनेक शेंदूर फासलेल्या दगडांना देवत्व प्राप्त झाले. त्यांच्याकडे पाहून डॉ. आंबेडकरांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. 'सत्यमेव जयते' हे ब्रीदवाक्य राष्ट्राने आपल्या डोक्यावर धारण केले आहे. पण आज सत्य औषधापुरते नव्हे, तर औषधालाही मिळत नाही. नफेखोरांचेच राज्य चालले आहे व जनतेच्या प्रश्नांशी त्यांना काहीच देणे-घेणे नाही. म्हणून डॉ. आंबेडकरांची आठवण जनतेला रोजच येत आहे. डॉ. आंबेडकर हे घटनेचे शिल्पकार होते. मानव समाजावरील आणि हिंदू धर्मावरील अस्पृश्यतेचा कलंक नाहीसा करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर लढा दिला. 

शिवसेनेतर्फे महामानवाचे स्मरण

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला राज्यघटना दिली. न्याय, स्वातंत्र्य , लोकशाही , नागरिकांचा हक्क यांचा पुरस्कार केला . आज त्या घटनेची पदोपदी पायमल्ली होत आहे . न्यायालये , वृत्तपत्रे , निवडणूक आयोग , संसद असे सर्व घटनात्मक स्तंभ कोलमडून पडले आहेत. देशात काय घडत आहे हे जाणून घेण्याचा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. लोकशाहीतला तो पहिला धडा असतो . परंतु आजच्या सरकारने लोकशाहीच्या या प्राथमिक मूल्यावरच प्रहार केला आहे ! अशा वेळी डॉ . बाबासाहेब आंबेडकरांचे स्मरण प्रकर्षाने होतेय . लोकशाही, स्वातंत्र्य जेव्हा जेव्हा संकटात येईल त्या त्या वेळी डॉ . बाबासाहेब आंबेडकर या महामानवाचे स्मरण करावेच लागेल ! आम्ही आमच्या तमाम शिवसैनिकांतर्फे ते करीत आहोत !

 

 

Web Title: "Constitution is being devalued today; Dr. Ambedkar, the country is in trouble'', Says shivsena on central and state government polity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.