जम्बो कार्यकारिणीचा घटनात्मक पेच
By admin | Published: June 6, 2014 12:49 AM2014-06-06T00:49:28+5:302014-06-06T00:49:28+5:30
अ. भा. मराठी मध्यवर्ती नाट्य परिषदेची घटना न पाळणार्या शाखा बरखास्त करण्यात येणार असल्याची चर्चा मधल्या काळात होती. ज्या शाखांमध्ये १५ पेक्षा जास्त कार्यकारिणी सदस्य आहेत,
सर्व शाखांमध्ये सुसूत्रता आणणार : नागपूर शाखेचे मध्यवर्तीला पत्र
नागपूर : अ. भा. मराठी मध्यवर्ती नाट्य परिषदेची घटना न पाळणार्या शाखा बरखास्त करण्यात येणार असल्याची चर्चा मधल्या काळात होती. ज्या शाखांमध्ये १५ पेक्षा जास्त कार्यकारिणी सदस्य आहेत, त्या शाखाच बरखास्त करण्यात येतील, असेही बोलले गेले. नागपूर शाखेची कार्यकारिणी २९ सदस्यांची आहे. त्यामुळे नागपूर शाखेची कार्यकारिणी मध्यवर्ती बरखास्त करणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
यासंदर्भात मध्यवर्ती शाखेच्या नियामक मंडळाने कार्यकारिणी १५ सदस्यांचीच करावी, असे पत्र नागपूर शाखेला पाठविले आहे. नागपूरचे कार्यकारिणी सदस्य आतापर्यंत असे पत्र मिळाले नसल्याचे सांगत होते. पण ३१ मे रोजी झालेल्या नागपूर कार्यकारिणीच्या बैठकीत हा विषय चर्चेला घेण्यात आला. त्यात नागपूरच्या कार्यकारिणीने घटनात्मक रस्ता काढला आहे. त्यामुळे मध्यवर्ती घटनेतील तरतुद मानणार की नागपूर शाखा बरखास्त करणार, अशी कुजबूज नाट्यक्षेत्रात सुरू झाली आहे. अ.भा. मराठी नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती शाखेची घटना आहे. मुळात कुठल्याही शाखेची स्वतंत्र घटना नाही आणि तसा अधिकारही शाखांना नाही. मध्यवर्तीचीच घटना नियमाप्रमाणे सर्व शाखांना बंधनकारक आहे. पण अनेक शाखा मध्यवर्तीच्या घटनेप्रमाणे कारभार करीत नाहीत. यासंदर्भात केंद्रीय कार्यकारिणीची २३ फेब्रुवारी रोजी बैठक झाली. या विषयावर नाट्य परिषदेचे सल्लागार येडूरवार यांनी चर्चा केली. त्यात सर्व शाखांनी मध्यवर्तीची घटना पाळायलाच हवी आणि त्याप्रमाणेच शाखांचा कारभार झाला पाहिजे, असा निर्णय घेण्यात आला. ज्या शाखा मध्यवर्तीची घटना पाळणार नाहीत त्यांची कार्यकारिणीच बरखास्त करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला होता.
यासंदर्भातले पत्र सर्व शाखांना पाठविण्यात आले आहे. नाट्य परिषदेच्या सर्व शाखांचा समन्वय आणि मध्यवर्तीच्या योजना, निर्णय शाखांना या निर्णयामुळे बंधनकारक आणि अनिवार्य असतील. केवळ बैठका किती अंतराने घ्यायच्या, आमसभा के व्हा घ्यायची आदींबाबत नियमात शिथिलता आणण्याचा अधिकार शाखेच्या अध्यक्षांना असतील. परंतु प्रत्येक शाखेची कार्यकारिणी मात्र १५ सदस्यांचीच असली पाहिजे, यावर मध्यवर्तीने आग्रही भूमिका घेतली आहे.
नागपूर शाखेची कार्यकारिणी २९ सदस्यांची आहे. केवळ १५ सदस्यांचीच कार्यकारिणी असली पाहिजे. उपाध्यक्ष चार असले तरी चालतील पण कार्यकारिणी संख्या १५ च्यावर चालणार नाही. त्यामुळे नागपूर नाट्य परिषदेच्या निर्णयाकडे सर्वांचेच लक्ष आहे. नागपूर शाखेत सार्यांचे वाद मिटविण्याचा प्रयत्न करताना जम्बो कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. पण मध्यवर्तीच्या निर्णयामुळे पदांची संख्या कमी होणार. अर्थात १४ सदस्यांना पदांपासून मुकावे लागण्याची शक्यता आहे. त्यात पुणे-चिंचवड, रत्नागिरीच्या शाखांचीही सदस्य संख्या २0 आणि त्यापेक्षा जास्त आहे. या शाखाही मध्यवर्ती बरखास्त करणार का, असा प्रश्न आहे. (प्रतिनिधी)