संविधानाच्या शिल्पकाराचा साताऱ्यात घडला पाया!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2015 10:41 PM2015-11-05T22:41:25+5:302015-11-05T23:54:08+5:30

११५ वर्षे पूर्ण : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिन जिल्हाभर होणार उत्साहात साजरा

Constitutional sculptor found in Satara! | संविधानाच्या शिल्पकाराचा साताऱ्यात घडला पाया!

संविधानाच्या शिल्पकाराचा साताऱ्यात घडला पाया!

googlenewsNext

प्रदीप यादव--सातारा ज्ञानरूपी आकाशात आपल्या विलक्षण प्रतिभेचे तेजस्वी वलय निर्माण करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शालेय जीवनात पहिलं पाऊल टाकलं, ते सातारच्या शाळेत. तो दिवस म्हणजे ७ नोव्हेंबर १९००. ज्ञानरूपी आकाशात भरारी मारण्याचं बळ त्यांना दिलं ते सातारच्या मातीनं. म्हणूनच या मातीला आणि मातीतून घडलेल्या या प्रज्ञावंताला वंदन करण्यासाठी शनिवार, दि. ७ रोजी जिल्हाभर डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रवेश दिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.
डॉ. आंबेडकर यांनी सातारा हायस्कूलमध्ये (सध्याचे प्रतापसिंह महाराज हायस्कूल) इयत्ता पहिली इंग्रजी या वर्गात प्रवेश घेतला. हजेरी पुस्तकावर ‘भिवा’ असे त्यांचे नाव होते. चार वर्षे त्यांनी या शाळेत शिक्षण घेतले. याच शाळेत त्यांच्या शिक्षणाचा पाया मजबूत झाला. या मातीला वंदन करण्यासाठी दरवर्षी शाळा प्रवेशदिनी असंख्य लोक हायस्कूलला भेट देतात. बाबासाहेबांचा शाळा प्रवेश दिन हा युगांतराची चाहूल देणारी व इतिहासाला कूस बदलावयास लावणारी क्रांतिकारी घटना आहे, अशी माहिती आयोजक अरुण जावळे यांनी दिली.

शनिवारी विविध कार्यक्रम
शनिवारी सकाळी साडेदहा वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात मानवंदना दिली जाणार आहे. सायंकाळी पाच वाजता प्रतापसिंह महाराज हायस्कूल येथे परिवर्तनवादी गीतांचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर मुख्य सोहळ्यास प्रारंभ होणार आहे. यावेळी श्रमिक मुक्ती दलाचे प्रणेते डॉ. भारत पाटणकर, भारतीय आयुर्विमा महामंडळाचे वरिष्ठ मंडल प्रबंधक तुलसीदास गडपायले, नागपूर तसेच प्राचार्य डॉ. संजय कांबळे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक अरुण जावळे यांनी केले आहे.


सदर बझार ते शाळा पायी प्रवास
डॉ. आंबेडकर हे आपल्या कुटुंबीयांस सदर बझार येथील सिटी सर्व्हे नंबर १ मधील ब्रिटिशकालीन बंगल्यात राहत होते. तेथून ते राजवाडा येथील सातारा हायस्कूल हा (सध्याचे प्रतापसिंह महाराज हायस्कूल) प्रवास ते पायी करायचे. त्यांच्या पाऊलखुणा उमटलेल्या या मार्गालाही विशेष महत्त्व आहे.
बाबासाहेबांची पहिली स्वाक्षरी
शाळेच्या रजिस्टरला १९१४ या क्रमांकासमोर बाबासाहेबांची स्वाक्षरी आहे. इंग्रजीमध्ये केलेली ती स्वाक्षरी एखाद्या उच्चविभुषितालाही लाजवेल, अशी पल्लेदार आहे. हा ऐतिहासिक दस्तावेज आहे म्हणून शाळा प्रशासनाने तो जपून ठेवला आहे.

गेली बारा वर्षे डॉ. आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन राज्यभरात साजरा व्हावा, यासाठी प्रयत्न करत आहे. शिक्षण मंत्रालयाने परिपत्रक काढून हा दिवस राज्यभर साजरा करण्याच्या सूचना द्याव्यात, यासंदर्भात पत्रव्यवहार सुरू आहे. हा दिवस कसा साजरा करावा, याबाबत शासनाशी चर्चा झाली असून सकारात्मकता दर्शविण्यात आली आहे.
- अरुण जावळे, सामाजिक, वैचारिक चळवळीतील कार्यकर्ते

Web Title: Constitutional sculptor found in Satara!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.