राज्यात १४ हजार घरगुती शौचालयांची उभारणी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 02:42 AM2018-08-23T02:42:32+5:302018-08-23T02:43:09+5:30
स्वच्छ भारत मिशनअंतर्गत शेल्टर असोसिएट्सचे ‘एक घर-एक शौचालय’ मॉडेल; देशात या मॉडेलचा विस्तार केला जाणार
पुणे : संपूर्ण देशभरातूनच उघड्यावर शौच करण्याची समस्या हद्दपार करण्याचा विडा पुण्यातील शेल्टर असोसिएट्स या स्वयंसेवी संस्थेने उचलला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘स्वच्छ भारत मिशन’अंतर्गत ‘एक घर-एक शौचालय’ या मॉडेलच्या माध्यमातून संस्थेतर्फे राज्यात १४ हजार घरगुती शौचालयांची उभारणी करण्यात आली असून, त्याचा लाभ जवळपास ३ लाख ६० हजार नागरिकांना मिळाला आहे.
या मॉडेलमुळे राज्यातील पुणे, पिंपरी-चिंचवड, सांगली, कोल्हापूर, नवी मुंबई आणि ठाणे अशा ६ शहरांमधील नागरिकांची सार्वजनिक शौचालयांपासून सुटका झाली आहे. देशभरातील अनेक गावांमध्ये आजही घरांमध्ये शौचालयाअभावी उघड्यावर शौचास जावे लागत असल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे. त्याबाबत स्थानिक स्वराज्य संस्थांकडून कोणतीच पावले उचलली गेली नाहीत, ही दुर्दैवाची बाब आहे. पंतप्रधान मोदी यांनी ‘स्वच्छ भारत मिशन’ला सुरुवात करून स्वच्छतेच्या विषयासंबंधी जागरूकता निर्माण केली आहे. या मिशनअंतर्गत शेल्टर असोसिएट्स या संस्थेने या समस्येचे देशातून कायमचे उच्चाटन करण्यासंबंधी पुढाकार घेतला आहे.
संस्थेने राज्यात १४ हजार घरगुती शौचालये उभी करून कुटुंबांच्या जीवनाला दिशा दिली आहे. मात्र, ही संस्था तेवढ्यावरच थांबली नाही,
तर संस्थेने स्वत:च्या कार्याचे मूल्यांकनही गोखले इन्स्टिट्यूट आॅफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स संस्थेकडून करून घेतले.
हा मूल्यमापनपर पूर्व-पश्चात-नियंत्रण अभ्यास एका वर्षाहून अधिक कालावधीत करण्यात आला. यामध्ये पुणे, पिंपरी-चिंचवड, सांगली-मिरज व कोल्हापूर या ४ शहरांतील १६ झोपडपट्ट्यांतील जवळपास ४०० कुटुंबांचा समावेश करण्यात आला. मुख्यत्वे झोपडपट्ट्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले.
घरगुती शौचालयांचा शंभर टक्के वापर
या अभ्यास अहवालानुसार ८६.१ टक्के किशोरवयीन मुली सार्वजनिक शौचालयांचा वापर करीत असून, १३.९ टक्के मुलींना उघड्यावर शौचास जावे लागत असल्याचे समोर आले आहे. मात्र, घरगुती शौचालयांची उभारणी केल्यानंतर १०० टक्के किशोरवयीन मुलींनी वैयक्तिक घरगुती शौचालयांचा वापर करण्यास सुरुवात केली आहे.
पाच वर्षांखालील ९३.५ टक्के मुलांनी वैयक्तिक शौचालयांचा वापर करण्यास प्रारंभ केला असून, घरातच शौचालय उपलब्ध झाल्याने ६८ टक्के वेळेची बचत झाल्याचे पाहायला मिळाले. यातून उघड्यावर शौचाला बसण्याचे प्रमाण २९.६ टक्क्यांनी घटले असल्याची माहिती शेल्टर संस्थेकडून देण्यात आली.
‘स्वच्छता किती महत्त्वाची आहे, हे आपण सर्वजण जाणतो. शेल्टर असोसिएट्स शहरातील वंचित लोकांसाठी कार्यरत आहे. त्यांच्या घरगुती शौचालय उभारणीचा प्रभाव जाणून घेण्याकरिता त्या ठिकाणांचे सर्व तपशील आम्हाला जाणून घ्यायचे होते. त्याचा अभ्यास केल्यानंतर अत्यंत चांगले निष्कर्ष समोर आले. शेल्टर असोसिएट्स आणि आॅन-ग्राऊंड कामगारांच्या संपूर्ण टीमच्या कार्याचे हे जणू एक प्रमाणपत्रच आहे.
- अंजली राडकर, सहायक प्राध्यापक, गोखले इन्स्टिट्यूट
शहरातील वंचित लोकांच्या, ज्यांना मूलभूत स्वच्छतादेखील मिळत नाही, अशांच्या जीवनामध्ये सकारात्मक प्रभाव पाडण्याच्या उद्देशाने या कामाला सुरुवात केली. याचे श्रेय आर्थिकदृष्ट्या कमकुवत स्तरातील लोकांना जाते. ज्यांनी सार्वजनिक शौचालय ते वैयक्तिक शौचालय हा फरक खुल्या मनाने स्वीकारला आणि मुली व स्त्रियांकरिता स्वच्छता व सुरक्षेचे महत्त्व जाणले. स्वच्छता क्रांतीचे आणखी पाऊल टाकून देशभरातील विविध शहरांमध्ये या मॉडेलचा विस्तार केला जाणार आहे.
- प्रतिमा जोशी
सहसंस्थापिका व कार्यकारी संचालिका, शेल्टर संस्था