पर्यायी शिवाजी पुलाचे बांधकाम सुरू होणार - नितीन गडकरी
By admin | Published: September 9, 2016 01:01 PM2016-09-09T13:01:57+5:302016-09-09T13:01:57+5:30
कोल्हापूर-रत्नागिरी राज्यमार्गावरील महत्त्वाच्या पंचगंगा नदीवरील शिवाजी पुलाला पर्यायी पुलाच्या रखडलेल्या कामास परवानगी देण्याची स्पष्ट ग्वाही केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
Next
नवी दिल्ली / कोल्हापूर : कोल्हापूर-रत्नागिरी राज्यमार्गावरील महत्त्वाच्या पंचगंगा नदीवरील शिवाजी पुलाला पर्यायी पुलाच्या रखडलेल्या कामास येत्या पंधरा दिवसांत परवानगी देण्याची स्पष्ट ग्वाही केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी नवी दिल्लीत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत दिली. कागदी घोडे नाचवीत पुलाचे काम रखडवत ठेवल्याबद्दल गडकरी यांनी अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली. जुन्या पुलावरून वाहतूक होताना काही दुर्घटना झाली तर त्यास जबाबदार धरून अधिकाऱ्यांवर कारवाई करू, असा दमच गडकरी यांनी दिला. खासदार धनंजय महाडिक यांनी ही बैठक व्हावी, यासाठी पाठपुरावा केला होता.
पुलाच्या बांधकामाचा सुधारित प्रस्ताव पुरातत्त्व खात्याने दोन दिवसांत सादर करावा. पुढील आठवड्यात केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी घेऊन पंधरवड्यात पुलाच्या बांधकामास मंजुरी दिली जाईल, असे गडकरी यांनी स्पष्ट केले. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून रखडलेले काम या महिनाअखेरीस मार्गी लागण्याची चिन्हे आहेत. कोल्हापूरच्या
दृष्टीने ही एक दिलासादायक बाब आहे. बैठकीस केंद्रीय पर्यटनमंत्री जयकुमार रावळ, केंद्रीय पर्यटन आणि पुरातत्त्व खात्याचे राज्यमंत्री महेश शर्मा, राज्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पर्यावरण मंत्री सचिन परब, पुरातत्त्व खात्याचे महासंचालक नवनीत सोहनी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता निगोट, कार्यकारी अभियंता आर. के. बामणे, पुरातत्त्व खात्याचे सचिव ए. के. तिवारी, आदींसह पुरातत्त्व व पर्यटन खात्याचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
नव्या पुलाची गरज, कारण नसताना निर्माण झालेली आडकाठी आणि पुलाचे रखडलेले बांधकाम याबाबत खासदार महाडिक यांनी बैठकीत सादरीकरण करीत, पुलाचे काम तातडीने सुरू होण्याची आग्रही मागणी बैठकीत केली. महाड पुलाच्या दुर्घटनेनंतर महाडिक यांनी संसदेत प्रश्न विचारून शिवाजी पुलाच्या पर्यायी पुलाचे बांधकाम काही दुर्घटना झाल्यावर सरकार सुरू करणार आहे का? अशी विचारणा केली होती. या पार्श्वभूमीवर ही बैठक झाली.
बैठकीत मंत्री गडकरी यांनी पर्यायी पुलाच्या बांधकामामध्ये कोणते नियम आडवे येतात? अशी स्पष्ट विचारणा पुरातत्त्व खात्याकडे केली.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सकारात्मक आणि आक्रमक भूमिका घेतल्याने शिवाजी पुलास पर्यायी पुलाच्या बांधकामास परवानगी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विमानतळापाठोपाठ हा महत्त्वाचा प्रश्न मार्गी लागत आहे. प्रत्यक्षात काम सुरू होईपर्यंत पाठपुरावा करू.
- धनंजय महाडिक, खासदार
अधिकाऱ्यांची खरडपट्टी
सध्याचा शिवाजी पूल ब्रिटिशकालीन असून, १३५ वर्षांपेक्षा जुना झाला आहे. त्याला समांतर बांधण्यात आलेल्या पुलाचे ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. ज्या ठिकाणी हेरिटेज परिसर घोषित झाला आहे, तिथे कोणतेही प्राचीन वास्तू नाही. सध्या तिथे अतिक्रमणे वाढली असून, अस्वच्छता पसरली असल्याचे खासदार महाडिक यांनी निदर्शनास आणून दिले. त्यावर गडकरी चांगलेच संतप्त झाले व त्यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. ‘पदाच्या खुर्चीवर बसून कोणी लोकहिताच्या प्रकल्पांच्या आडवे येत असतील तर त्यांची गय केली जाणार नाही,’ असे ते म्हणाले.
दोन दिवसांत अधिसूचना
केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री महेश शर्मा यांनीही शिवाजी पुलाला पर्यायी पुलाचे रखडलेले बांधकाम सुरू करण्यासाठी येत्या दोन दिवसांत अधिसूचना काढली जाईल, असे सांगितले. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या येत्या बैठकीत हा विषय मांडण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.