बांधकाम तिवरांपासून केवळ तीन फुटांवर

By admin | Published: September 13, 2016 05:36 AM2016-09-13T05:36:46+5:302016-09-13T05:36:46+5:30

लाच मागणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचे नाव जाहीर करू न शकल्याने विनोदवीर कपिल शर्मा गोत्यात आला आहे. एकीकडे पालिकेच्या कारवाईचा ससेमिरा त्याच्या मागे लागला

Construction is only three feet away from the trips | बांधकाम तिवरांपासून केवळ तीन फुटांवर

बांधकाम तिवरांपासून केवळ तीन फुटांवर

Next

मुंबई : लाच मागणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचे नाव जाहीर करू न शकल्याने विनोदवीर कपिल शर्मा गोत्यात आला आहे. एकीकडे पालिकेच्या कारवाईचा ससेमिरा त्याच्या मागे लागला असताना, राजकीय आणि सामाजिक संस्थांनीही त्याचे पितळ उघडे पाडले आहे. खारफुटीपासून ५० फुटांपर्यंत कोणतेही बांधकाम करण्यास मनाई असताना, कपिलच्या वर्सोवा येथील बंगल्याचे बांधकाम खारफुटीपासून फक्त तीन फुटांवर असल्याचे सोमवारी उजेडात आले. वनविभाग व तहसीलदारांनी केलेल्या पाहणीतून ही धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे आता कपिलचेच धाबे दणाणले आहेत.पालिका अधिकाऱ्याने पाच लाख रुपये लाच मागितल्याचे टिष्ट्वट करत, कपिलने गेल्या आठवड्यात शुक्रवारी खळबळ उडवून दिली होती.

मात्र, त्या अधिकाऱ्याचे नाव त्याने अद्याप उघड केलेले नाही. याउलट आता त्याचा बचाव सुरू आहे. वर्सोवा खाडीच्या परिसरात खारफुटीवर अतिक्रमण करत, अनेक बांधकामे येथे उभी असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र सागरी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकारणाकडे केली आहे. कपिलच्या एकमजली बंगल्याच्याच शेजारी असे काही आणखी
बंगले आहेत, ज्यांनी गेल्या काही वर्षांमध्ये आपले बांधकाम वाढवून खारफुटींवर अतिक्रमण केले आहे. या अतिक्रमणाचे उपग्रहाच्या सहाय्याने घेतलेले छायाचित्र ‘वॉचडॉग फाउंडेशन’ या संस्थेने प्राधिकारणाकडे पाठवले आहे.

वनसंवर्धक अधिकारी मकरंद बोडके यांनी याची दाखल घेत, सोमवारी दुपारी या परिसराची पाहणी केली. जीपीसच्या साह्याने या परिसराचे ३०० ते ४०० मीटरपर्यंत सर्वेक्षण करण्यात आले. त्यातच अंधेरीच्या तहसीलदारांनीही येथे पाहणी करत, कपिल शर्माच्या बंगल्याचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले. त्यानुसार, झालेल्या पाहणीनंतर कपिलचे पितळ उघडे पडले
असून, कपिलवर आता कठोर कारवाई होण्याची मागणी जोर धरत आहे. ज्या परिसरात कपिलचा बंगला आहे, तिथे अन्य सेलिब्रिटीजचेही बंगले आहेत. संबंधितांनीही कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप मनसेने केला आहे. त्यांच्यावरही कारवाईची मागणी केली आहे.

गोरेगाव येथील बांधकामावर पुढच्या आठवड्यात कारवाई
गोरेगाव येथील डीएचएस एनक्लेव्ह या इमारतीमध्ये कपिल शर्मा आणि अभिनेता इरफान खानसह १६ फ्लॅटधारकांनी त्यांच्या मजल्यावरील जागा पार्किंगची जागा बळकावली असल्याचे उजेडात आले आहे. या प्रकरणी पालिकेच्या पी साउथ विभागाने दोन वेळा नोटीस बजावली आहे. त्यानुसार, पोलिसांनी पंचनामा करून १६ फ्लॅटधाराकांवर गुन्हा दाखल केल्यावर, पुढच्या आठवड्यात येथील बेकायदा बांधकामावर कारवाई होण्याचे संकेत आहेत.


कपिल शर्मावर गुन्हा दाखल
गोरेगाव येथील बांधकामात नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कपिल शर्मा याच्यावर ओशिवरा पोलीस ठाण्यात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोरेगाव येथील ओशिवरा न्यू लिंक रोडवरील डीएलच इनक्लेव्ह या इमारतीच्या नवव्या मजल्यावर कपिलचा फ्लॅट आहे. याच बिल्डिंगच्या पाचव्या मजल्यावर राहणाऱ्या इरफान खानवरही अशाच प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर वर्सोवा येथे तिवरांची कत्तल करत, अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी वर्सोवा पोलिसांनी कपिलवर अदखलपात्र गुन्हा नोंदवला आहे.

दोन वर्षांच्या कैदेची तरतूद : खारफुटीपासून ५० फुटांपर्यंत कोणतेही बांधकाम करण्यास मनाई आहे. बेकायदा बांधकाम आणि खारफुटीवर अतिक्रमण केल्यास, अनधिकृत गौणखनिज भराव अंतर्गत अधिनियम १९६६ चे कलम ४८ (७) व (८) अनुसार दंडात्मक व कायदेशीर करवाई होऊ शकते. हा गुन्हा सिद्ध झाल्यास दोन वर्षांची कैद होऊ शकते.

राज्यपालांनी हस्तक्षेप करावा : मनसेने एकीकडे कपिलची कोंडी केली असताना, काँग्रेसने त्याची बाजू उचलून धरली आहे. कपिलच्या आरोपांची दखल घेऊन, दोषी अधिकाऱ्यांचा शोध लावण्याऐवजी त्यांच्या बेकायदा बांधकामाचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे राज्यपालांनीच यात हस्तक्षेप करून चौकशीचे आदेश द्यावेत, अशी मागणी काँग्रेसचे मुंबईचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केली आहे.

Web Title: Construction is only three feet away from the trips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.