‘शेतीपंप वीजबिले रद्द करण्यासाठी महापूरग्रस्त ग्राहकांनी तक्रार अर्ज करावेत’
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2019 05:34 AM2019-12-30T05:34:15+5:302019-12-30T05:34:24+5:30
मुंबई : राज्यातील महापूरबाधित जिल्ह्यातील सर्व महापूरग्रस्त शेतीपंप वीजग्राहकांची वीजपुरवठा खंडित कालावधीतील सर्व वीज बिले संपूर्णपणे रद्द करावीत, या ...
मुंबई : राज्यातील महापूरबाधित जिल्ह्यातील सर्व महापूरग्रस्त शेतीपंप वीजग्राहकांची वीजपुरवठा खंडित कालावधीतील सर्व वीज बिले संपूर्णपणे रद्द करावीत, या मागणीसाठी वैयक्तिक वीजग्राहकांचे अर्ज दाखल करण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. त्यानुसार राज्यातील कोल्हापूर, सांगली, सातारा, गडचिरोली, चंद्रपूर व अन्य सर्व संबंधित जिल्ह्यांतील महापूरग्रस्त शेतकऱ्यांनी तक्रार अर्ज दाखल करावेत, असे आवाहन महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशन व महाराष्ट्र वीजग्राहक संघटना यांच्या वतीने करण्यात आले आहे.
५ आॅगस्ट २०१९ रोजी कोल्हापूर, सांगली व सातारा या तीन जिल्ह्यांमध्ये महापूर आला. त्याच दरम्यान राज्यात गडचिरोली, चंद्रपूर व अन्य काही जिल्ह्यांत महापुराने थैमान घातले. या सर्व महापूरबाधित जिल्ह्यांतील महापूरग्रस्त शेतीपंप वीजग्राहकांचा ५ आॅगस्ट रोजी बंद झालेला वीजपुरवठा अनेक ठिकाणी अद्याप सुरू झालेला नाही. तरीही या वीजग्राहकांना वीजपुरवठा झालेला नसतानाही वीजबिले येत आहेत. या सर्व शेतीपंप ग्राहकांची वीजपुरवठा बंद कालावधीतील सर्व वीजबिले व झालेली चुकीची आकारणी संपूर्णपणे रद्द करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहेत. महापूरग्रस्त शेतीपंप वीजग्राहकांनी येत्या १५ दिवसात तक्रार अर्ज दाखल करावेत, पोहोच घ्यावी व तक्रार दाखल केलेल्या अर्जदारांची यादी वीजग्राहक संघटना अथवा इरिगेशन फेडरेशनकडे पाठवावी, असे आवाहन प्रताप होगाडे यांनी केले आहे.