शेताततला कांदा थेट ग्राहकांपर्यंत
By Admin | Published: October 17, 2015 03:11 AM2015-10-17T03:11:16+5:302015-10-17T03:11:16+5:30
दुष्काळ, अवकाळी पाऊस, साठेबाजार या सगळ्या गोष्टींमुळे कांद्याचे भाव मध्यंतरी कमालीचे वाढले होते. कांदा शंभरी गाठेल की काय, असे अडाखे बांधले जात होते.
अरुणकुमार मेहत्रे , कळंबोली
दुष्काळ, अवकाळी पाऊस, साठेबाजार या सगळ्या गोष्टींमुळे कांद्याचे भाव मध्यंतरी कमालीचे वाढले होते. कांदा शंभरी गाठेल की काय, असे अडाखे बांधले जात होते. मात्र ओला कांदा मार्केटमध्ये आल्याने कांद्याचे भाव काही प्रमाणात कमी झाले आहेत. मात्र आजच्या घडीला किरकोळ बाजारात सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर कांदा गेला आहे. कांदा ही जीवनावश्यक बाब झाली असून, किंमत वाढली की सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी येते. आता ओल्या कांद्यालासुद्धा प्रति किलो ५० रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे जिथे त्यापेक्षा कमी किमतीत कांदा मिळतो याचा शोध ग्राहक घेतच असतात. ही नस पकडून मूळचे जुन्नर तालुक्यातील ओतूर येथील विपुल आणि अतुल डुंबरे या दोघा भावांनी आपल्या शेतात पिकलेला कांदा बाजार समितीत न नेता कामोठे येथे टेम्पो भरून आणला आहे. कामोठे येथे रस्त्याच्या कडेला टेम्पो उभा करून विक्र ी सुरू केली आहे. चार कि.मी. क्षमता असलेल्या बॅगेत सव्वातीन किलो कांदे भरून ती बॅग १२० रुपयांना दिली जात आहे. त्यांनी टेम्पोसमोर एक आकर्षक बॅनर्स लावून कांद्याची विक्री सुरू केली आहे. स्वस्तात कांदा मिळत असल्याने कामोठेकरांचा चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. आमच्याकडे १० टन माल असून, तो थेट ग्राहकांना विकणार असल्याचे डुंबरे याने सांगितले. येत्या दोन दिवसांत खारघर, कळंबोली, नवीन पनवेल या वसाहतीत आम्ही सेल लावणार असल्याचेही तो म्हणाला. मी आयटी इंजिनीअर असून, कंपनीत नोकरीही करतो. मात्र सुटी व सकाळ-संध्याकाळी विक्रीसाठी येतो, आपल्या घरचा माल विकण्याची लाज काय बाळगायची, असे तो म्हणाला.