भाजी खरेदीकडे ग्राहकांची पाठ
By admin | Published: June 6, 2017 01:35 AM2017-06-06T01:35:17+5:302017-06-06T01:35:17+5:30
शहरात बंदच्या सावटामुळे किरकोळ विके्रत्यांसह सर्वसामान्य ग्राहकांनीही भाजी खरेदीकडे पाठ फिरविल्याचे चित्र सोमवारी दिसून आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : भाज्यांची उपलब्धता असूनही शहरात बंदच्या सावटामुळे किरकोळ विके्रत्यांसह सर्वसामान्य ग्राहकांनीही भाजी खरेदीकडे पाठ फिरविल्याचे चित्र सोमवारी दिसून आले. त्यामुळे घाऊकसह किरकोळ बाजारात रविवारच्या तुलनेत सर्व भाज्यांचे भाव निम्म्याने खाली आले.
महाराष्ट्र बंदचे सावट बाजारातील उलाढालीवर दिसून आले. बंदमुळे अनेक शेतकऱ्यांनी बाजाराकडे पाठ फिरविली. त्यामुळे रविवारी बाजारात रविवारच्या तुलनेत निम्मीच म्हणजे केवळ ३५ टक्के आवक झाली. आवक कमी होऊनही मागणीअभावी भाज्यांचे भावही निम्म्याने उतरले आहेत.
ज्येष्ठ अडते विलास भुजबळ म्हणाले, ‘‘बंदमुळे सोमवारी आवक कमी झाली असली तरी ग्राहकांनी खरेदीकडे पाठ फिरविली. अनेक किरकोळ विक्रेत्यांनी रविवारीच भाज्यांची मोठी खरेदी केली होती. त्यातच बंदमुळे अनेक जण बाजारात फिरकले नाही. त्यामुळे आवक कमी होवूनही काही प्रमाणात भाजीपाला शिल्लक राहिला. तसेच कांदा, लसूण आणि पालेभाज्या वगळता इतर सर्व भाज्यांचे भाव निम्म्याने खाली आहेत.’’
तर काम बंद आंदोलन : डॉ. बाबा आढाव
शेतमालाला हमीभाव, कर्जमुक्ती व शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांवर राज्य शासनाने लवकरात लवकर ठोस निर्णय जाहीर करावा, अन्यथा राज्यातील बाजार समित्यांमधील हमाल काम बंद आंदोलन करतील, असा इशारा ज्येष्ठ कामगारनेते डॉ. बाबा आढाव यांनी दिला. श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात कामगार युनियनच्या वतीने आयोजित बैठकीत ते बोलत होते. ते म्हणाले, ‘‘अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफी, हमीभावाबाबत कायदा, हमीभावापेक्षा कमी दराने विक्री करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणा शंकास्पद वाटतात. त्यासाठीची ठोस भूमिका शासनाने जाहीर करायला हवी. पेन्शन व शेतकऱ्यांना मोफत वीज, पाणी याबाबत मुख्यमंत्री काहीच बोलले नाहीत़ ’’
भुसार बाजारात हमालांचा बंद
मार्केट यार्डातील भुसार बाजारातील हमालांनी सोमवारी शेतकरी संप व महाराष्ट्र बंदला पाठिंबा देत काम बंद ठेवले. त्यामुळे बाजारातील उलाढाल जवळपास ठप्प झाली होती. बंद असला तरी व्यापाऱ्यांनी दुकाने उघडली होती. मालाचीही काही प्रमाणात आवक झाली. मात्र, हमाल नसल्याने व्यवहार झाले नाहीत, असे दि पूना मर्चंट्स चेंबरचे अध्यक्ष प्रवीण चोरबेले यांनी सांगितले.