२३ टन अमली पदार्थ जप्त
By admin | Published: April 25, 2016 05:07 AM2016-04-25T05:07:21+5:302016-04-25T05:07:21+5:30
‘एव्हॉन लाइफ सायन्सेस लिमिटेड’ या कंपनीतून ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमली पदार्थविरोधी पथकाने अन्न व औषध प्रशासन विभागाच्या मदतीने सुमारे २३ टन अमली पदार्थांचा साठा हस्तगत केला
ठाणे : सोलापूरच्या ‘एव्हॉन लाइफ सायन्सेस लिमिटेड’ या कंपनीतून आतापर्यंत ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमली पदार्थविरोधी पथकाने अन्न व औषध प्रशासन विभागाच्या मदतीने सुमारे २३ टन अमली पदार्थांचा साठा हस्तगत केला आहे. कंपनीचा सल्लागार पुनीतच्या इशाऱ्यावरूनच ‘इफेड्रीन’ची तस्करी राजरोसपणे सुरू होती, अशी माहिती तपासात उघड झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
चिंचोली एमआयडीसीतील या कंपनीत सुमारे १३० कामगार आहेत. त्या सर्वांचे जबाब नोंदवण्याचे काम सुरू असून त्यातील ४० कामगारांच्या जबाबातून बरीच माहिती हाती आल्याचे सहायक पोलीस आयुक्त भरत शेळके यांनी सांगितले. उर्वरित ९० कामगारांचीही चौकशी केली जाणार आहे. या कंपनीचा सल्लागार पुनीत श्रीगी (रा. विरार, जिल्हा पालघर) याच्याच इशाऱ्यावरून कंपनीतील माल बाहेर काढला जात होता. आलेला माल एका कारमधून वितरीत करण्यात येत होता.
कंपनीतील हा अमली पदार्थांचा व्यवहार उघड होऊ नये, म्हणून पुनीतने तिथले सर्व सीसीटीव्ही बंद केले होते. ठाण्यात सागर पोवळे आणि मयूर सुगदरे या दोघांना पकडल्यानंतर या कंपनीतून सुमारे साडेअठरा टन इफेड्रीनचा साठा ठाणे पोलिसांनी हस्तगत केला. त्याचवेळी सोलापुरातून स्वामी धानेश्वर आणि राजेंद्र डिमरी अशा चौघांना अटक करण्यात आली. त्यापाठोपाठ त्याच कंपनीतील दुसऱ्या धाडीत दोन टन इफेड्रीन तसेच अडीच हजार लीटर अॅसिटीक अॅनहायड्रीक लिक्वीड असा सुमारे २३ टन अमली पदार्थांचा साठा पोलिसांनी हस्तगत केला. (प्रतिनिधी)
>अॅसिटिक अनहायड्रीकपासून ब्राउन शुगर
या कंपनीत दोन टन ६०० लीटर अॅसिटिक अनहायड्रीक जप्त करण्यात आले आहे.
याच लिक्वीडपासून सुंडो इफेड्रीन तयार करून ती पावडर अफूच्या पावडरमध्ये मिसळून त्यापासून ब्राउन शुगर, गर्द आणि हेरॉइन या अमली पदार्थांची निर्मिती केली जात होती.
>धाडसत्र सुरूच...
या कंपनीत गेल्या एक आठवड्यापासून सुरू असलेले धाडसत्र अद्यापही सुरूच आहे. कंपनीच्या वेगवेगळ्या विभागांची कसून तपासणी केली जात आहे.
पुणे, मुंबई आणि सोलापूर येथील अन्न व औषध प्रशासन विभागाच्या मदतीने ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमली पदार्थविरोधी पथकाने धाडसत्र सुरूच ठेवले आहे.
>मालकही चौकशीच्या फेऱ्यात
या कंपनीचे मालक अजित कामत, राजेंद्र कैमल आणि मनोज जैन या तिघांचीही अमली पदार्थविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम शेळके यांनी चौकशी केली.
या तिघांनीही या प्रकरणातून हात झटकले असून आपण कसे निर्दोष आहोत, असा पवित्रा घेतला आहे. अर्थात, त्यांची कसून चौकशी केली जाणार असून, या प्रकरणाची पाळेमुळे शोधून काढली जाणार असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपायुक्त पराग मणेरे यांनी दिली.