तलाठ्यांचा संप मिटला
By Admin | Published: April 30, 2016 05:07 AM2016-04-30T05:07:47+5:302016-04-30T05:07:47+5:30
राज्यात तलाठ्यांचा बेमुदत संप चार दिवसांनंतर मिटला.
औरंगाबाद : राज्यात तलाठ्यांचा बेमुदत संप चार दिवसांनंतर मिटला. शुक्रवारी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यासोबत सुभेदारी विश्रामगृह येथे झालेल्या चर्चेअंती संप मागे घेण्यात आल्याचे राज्य तलाठी, पटवारी, मंडळ अधिकारी समन्वय महासंघाचे सरचिटणीस सतीश तुपे यांनी सांगितले.
महसूलमंत्र्यांसोबत गुरुवारी मुंबईत झालेली बैठक निष्फळ ठरली होती. त्यानंतर महसूलमंत्र्यांनी फोन करून शुक्रवारी औरंगाबादेत बैठक घेण्याचे ठरविले. बैठकीत सर्व पदाधिकाऱ्यांसमक्ष समाधानकारक तोडगा निघाल्याचे सांगून तुपे म्हणाले, की संप स्थगित करण्याचा निर्णय महासंघाने घेतला आहे. तलाठी साजा पुनर्रचनेबाबत सरकार सकरात्मक आहे. मंडळ कार्यालये बांधण्याचा प्रस्ताव वित्त विभागाकडे देण्यात आला आहे.
आॅनलाईन सातबारा प्रक्रियेसाठी सुविधा देण्याबाबत सरकार राजी होत नव्हते. आजच्या बैठकीत त्यावर तोडगा निघाला आहे. त्यामुळे संप स्थगित करण्याची भूमिका घेतली. चर्र्चेला महासंघाचे अध्यक्ष अशोक कोकाटे, तलाठी संघाध्यक्ष ज्ञानदेव डुबल, महादेव राजूरकर, संजय अन्व्हणे आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)