कोपरगावमध्ये संप चिघळला
By admin | Published: June 2, 2017 01:23 AM2017-06-02T01:23:05+5:302017-06-02T01:23:05+5:30
जिल्ह्यात पहाटेपासूनच सर्व महामार्गावर दूध-भाजीपाल्याची वाहने अडविण्यात आली. हजारो लीटर दूध रस्त्यावर ओतण्यात आले
Next
>अहमदनगर : जिल्ह्यात पहाटेपासूनच सर्व महामार्गावर दूध-भाजीपाल्याची वाहने अडविण्यात आली. हजारो लीटर दूध रस्त्यावर ओतण्यात आले. पारनेर तालुक्यातून मुंबईकडे जाणारे दूध आणि भाजीपाला रस्त्यावरच अडविण्यात आला. कोपरगाव तालुक्यात येवला चौफुलीजवळ शेतकऱ्यांनी मोसंबीचा ट्रक पेटवून दिल्याने संपाला हिंसक वळण लागले.
या प्रकरणी ११ शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे कोपरगावात संप चिघळला आहे. शेतमालाच्या ४० ते ५० ट्रकची आंदोलकांनी मोडतोड केली आहे. पोलिसांना तेथे अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. धडक कृती दलाची तुकडी कोपरगावला दाखल झाली आहे. राहुरी, संगमनेर, नेवासा तालुक्यात महामार्गावर टँकर अडवीत शेतकऱ्यांनी दूध ओतून दिले. पारनेर, अकोले तालुक्यात बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या होत्या. तेथे भाजपा नेते माधव भंडारी यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. श्रीरामपूरमध्ये पोलीस व शेतकरी यांच्यात आंदोलनाच्या वेळी बाचाबाची झाली. संपाचे केंद्रबिंदू असलेल्या पुणतांबा (ता. राहाता) येथे शेतकऱ्यांनी दूध ओतून संपात सहभाग घेतला. ग्रामीण भागातून दूध, भाजीपाला आवक बंद झाल्याने नगर शहरासह तालुक्याच्या ठिकाणच्या मंडई ओस पडल्या होत्या. नगरमध्ये भाजीपाला-फळांची आवक कमी झाली होती.
आठवडे बाजार, बाजार समित्या, खते-बी-बियाणे विक्रीची दुकाने, खासगी व सहकारी दूध संकलन केंद्रे बंद होती. पारनेर तालुक्यात टाकळी ढोकेश्वर येथे मुंबई-पुण्याला जाणारी दूध व भाजीपाल्याची वाहने अडविण्यात आली. निघोजमध्ये मोठ्या प्रमाणावर संपाला प्रतिसाद मिळाला. नगर तालुक्यात नगर-दौंड राज्यमार्गावर, नगर-सोलापूर मार्गावर रास्ता रोको करण्यात आला. कर्जत-जामखेडमध्ये शेतकऱ्यांनी दुधाचे टँकर अडविले.