चंदू चव्हाणांच्या सुटकेसाठी भारत साधणार पाक परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2016 08:39 AM2016-11-01T08:39:20+5:302016-11-01T08:52:26+5:30
पाकिस्तानच्या ताब्यातील भारतीय लष्करातील जवान चंदू बाबूलाल चव्हाण यांच्या सुटकेसाठी केंद्र सरकार आता पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधणार असल्याची माहिती मिळते आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 1 - पाकिस्तानच्या ताब्यातील भारतीय लष्करातील जवान चंदू बाबूलाल चव्हाण यांच्या सुटकेसाठी केंद्र सरकार आता पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधणार असल्याची माहिती मिळते आहे. भारतीय लष्कराने 29 सप्टेंबर रोजी पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक केले त्यावेळी चंदू चव्हाण यांनी अनावधानाने सीमा ओलांडल्याने ते पाकिस्तानात पोहोचले होते.
चंदू चव्हाण यांच्या सुटकेसाठी केंद्र सरकारने घेतलेला हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे. याआधी केवळ भारतीय लष्कराचे महासंचालक रणबीर सिंह यांनी चंदू चव्हाण यांच्या सुटकेसाठी पाकिस्तानी लष्कराकडे मागणी केली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी लष्कारातील महासंचालकांकडून याबाबत कोणतेही उत्तर मिळाले नव्हते. त्यामुळे, केंद्र सरकारने आता हा मुद्दा पाकिस्तानातील परराष्ट्र मंत्रालयसमोर मांडण्याचे ठरवले आहे.
आणखी बातम्या
याआधी, चंदू चव्हाण यांना परत आणण्यासाठी लष्करी कारवायांचे महासंचालकांच्या (डीजीएमओ) पातळीवर प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दिली होती. पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय लष्कराने केलेल्या सर्जिकल स्ट्राईक व धुळ्याचे जवान चंदू चव्हाण यांचा पाकिस्तानच्या हद्दीत जाण्याचा काही संबंध नाही. चुकून नियंत्रणरेषा ओलांडून पलिकडील देशाच्या हद्दीत गेलेल्या जवानांना परत पाठवण्यासाठी स्टॅण्डर्ड मेकॅनिझम ही कार्यपद्धती पूर्वीपासूनच आहे. चंदू चव्हाण यांनीही चुकून नियंत्रणरेषा ओलांडली आहे. त्यांना परत आणण्यासाठी याच पद्धतीचा वापर केला जात आहे,असे पर्रीकर यांनी सांगितले होते.
भारतीय लष्करातील चंदू चव्हाण हे मूळचे धुळे जिल्ह्यातील रहिवासी आहेत. 37 राष्ट्रीय रायफल्समधील जवान चंदू चव्हाण यांनी सर्जिकल स्ट्राईकवेळी अनावधानाने नियंत्रण रेषा ओलांडून ते पाकिस्तानमध्ये गेले होते. दरम्यान, चव्हाण यांच्या सुटकेसाठी केंद्र सरकार युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.