विक्रमगडकरांना दूषित पाणी

By admin | Published: July 23, 2016 03:10 AM2016-07-23T03:10:51+5:302016-07-23T03:10:51+5:30

पावसाळ्यात दरवर्षीप्रमाणे विक्रमगडकरांना नगरपंचायतीकडून होणारा पाणीपुरवठा दूषित पद्धतीने सुरु झाला

Contaminated water to Vikramgadkar | विक्रमगडकरांना दूषित पाणी

विक्रमगडकरांना दूषित पाणी

Next

राहूल वाडेकर,

विक्रमगड- पावसाळ्यात दरवर्षीप्रमाणे विक्रमगडकरांना नगरपंचायतीकडून होणारा पाणीपुरवठा दूषित पद्धतीने सुरु झाला असून, या मातीमिश्रित पाण्यामुळे साथीचे आजार पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. नव्याने राबविण्यात आलेली फिल्टर योजनाही पावसाळ्यात कुचकामी ठरल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे.
डॉक्टर नेहमीच सांगत असतात की,पाणी उकळून व गाळून प्यावे. परंतु नळाद्वारे येणारे पाणीच मातीमिश्रित असल्याने त्यावर कितीही प्रक्रिया केली तरी ते आरोग्याचे दृष्टीने धोकादायक आहे. अशुद्ध पाण्याचा प्रश्न दरपावसाळ्यातील असल्याने प्रशासन कोणतीही उपाययोजना आखतांना दिसत नाही. नगरपंचायतीकडून पाणीपट्टी वसुली नियमित असल्याने पाण्याचा प्रश्न उद्भवतोच कसा, असा प्रश्न गावकरी विचारत आहेत.
नगरपंचायतीकडून पूर्वी ग्रामपंचायत काळात लाखो रुपयांची सुधारित फिल्टर योजना राबविण्यात आलेली आहे. परंतु या फिल्टर योजनेत फक्त उन्हाळ्यातच स्वच्छ पाणी पहावयास मिळते. कारण तेव्हा ते स्वच्छच असते मात्र पावसाळा सुरु होताच नळाद्वारे येणारे पाणी गढूळ व मातीमिश्रीत असल्याने तोंडातही घ्यावेसे वाटत नाही.
त्यातच इतर तालुक्यांच्या ग्रामपंचायती अगर जव्हार नगरपरिषद यांच्या तुलनेत विक्रमगड ग्रामपंचायतीची व सध्याची नगरपंचायतीची मासिक पाणीपट्टी जास्त म्हणजे १७५ रुपये आहे. सध्यस्थितीत विक्रमगड ही नगरपंचायत झाली असल्याने तिचा कारभार आणि जबाबदारी वाढली आहे. तसेच पाणीपुरवठ्यात लोकसंख्या वाढल्याने अजून भर पडली आहे. त्यामुळे आता नवीन सुधारित फिल्टर पाणीपुरवठा योजनेची मंजुरी मिळावी तसेच त्याची अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी होत आहे.
नगरपंचायत काय म्हणते...
सध्यस्थितीत पाणीपुरवठ्यामध्ये साडेचार लाख लीटर पाण्याची आवश्कता आहे. तर फिल्टर प्लॅनमध्ये फक्त दीड लाख लीटर पाणी मर्यादा असल्याने दिवसातून चार वेळेस सोडण्यात येणारे पाणी पावसाळ्यात गढूळ व मातीमिश्रीत स्थितीत नळाला येते. त्यामुळे साडेचार लाख लीटर पाणी फिल्टर करण्याची क्षमता असलेला फिल्टर प्लॅन हवा तरच गढूळ पाणीपुरवठ्यामध्ये उपाययोजना करता येणार आहे. नवीन फिल्टर व पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव पाठवलेला आहे. आम्ही सध्यस्थितीत आलामचा (तुरटी) वापर पाणी शुद्ध करणासाठी करीत आहोत. असे नगरपंचायत प्रशासनाने सांगितले.
विक्रमगड नगरपंचायतीमधील असलेल्या गावपाडयांना होणारा पाणीसाठा हा साडेचार लाख लीटरचा आहे. मात्र, पाणी फिल्टर प्लॅनची क्षमता दीड लाख लीटर असल्याने एवढे पाणी फिल्टर होऊ शकत नाही. त्यामुळेच दरवर्षी अशुद्ध पाणीपुरवठयाचा प्रश्न उद्भवत आहे. तरीही आम्ही पाण्यामध्ये आलाम टाकून शुध्दीकरणाचा प्रयत्न करतो!
- सुरेश सोनवणे, तहसीलदार तथा प्रशासक नगरपंचायत
>सध्या नळाला येणारे पाणी गढूळ व मातीमिश्रीत असल्याने आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. फिल्टर योजना असून नसल्यासारखी आहे. अव्वाचे सव्वा १७५ रुपये इतर तालुक्यांच्या मानाने जास्त अशी पाणीपट्टी असतानाही गढूळ पाणी का सेवन करायचे, असा सवाल आहे.
-रवींद्र आयरे,
ग्रामस्थ, विक्रमगड

Web Title: Contaminated water to Vikramgadkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.