अरुंधती रॉय यांना अवमानना नोटीस
By admin | Published: December 24, 2015 02:23 AM2015-12-24T02:23:55+5:302015-12-24T02:23:55+5:30
माओवादी डॉ. गोकराकोंडा नागा साईबाबाच्या जामिनावरून लिहिलेल्या लेखात न्यायव्यवस्थेवर अतिशय गंभीर व निंदास्पद आरोप केल्यामुळे बुकर पुरस्कारप्राप्त लेखिका अरुंधती रॉय यांना
नागपूर : माओवादी डॉ. गोकराकोंडा नागा साईबाबाच्या जामिनावरून लिहिलेल्या लेखात न्यायव्यवस्थेवर अतिशय गंभीर व निंदास्पद आरोप केल्यामुळे बुकर पुरस्कारप्राप्त लेखिका अरुंधती रॉय यांना मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी फौजदारी अवमानना नोटीस बजावली आणि २५ जानेवारी रोजी उत्तर सादर करण्याचे निर्देश त्यांना दिले आहेत.
‘आऊटलूक’च्या १२ मे २०१५ रोजीच्या अंकामध्ये रॉय यांचा लेख प्रकाशित झाला आहे. या लेखात रॉय यांनी केंद्र शासन, राज्य शासन, पोलीस व्यवस्था व सशस्त्र दलासह न्यायव्यवस्थेवरही टीका केली आहे.
साईबाबाला गुणवत्ता व वैद्यकीय कारणावरून जामीन मिळावा, यासाठी रॉय यांनी ही खेळी केली हे लेख वाचल्यानंतर लक्षात येते. सत्र न्यायालय व उच्च न्यायालयाने साईबाबाला जामीन नाकारला याबाबत अवगत असताना रॉय यांनी हा लेख लिहिला. साईबाबाला कोणत्याही परिस्थितीत जामीन मिळावा असे त्यांना वाटते, हे दिसून येते, असे न्यायमूर्ती अरुण चौधरी यांनी सांगितले.
रॉय स्वत:ला कायद्यापेक्षा
श्रेष्ठ समजतात
रॉय या स्वत:ला कायद्यापेक्षा श्रेष्ठ समजतात असे दिसून येते. यापूर्वी अशाच एका प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने त्यांना १ दिवसाचा कारावास व २००० रुपये दंड ठोठावला होता. ‘आऊटलूक’मधील लेखात रॉय न्यायव्यवस्थेवर गंभीर आरोप करण्याबरोबरच साईबाबाचा जामीन फेटाळण्याच्या आदेशावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.हा न्यायालयाचा फौजदारी अवमान आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.