'ती'चे WhatsApp स्टेटस वारंवार पाहणेही विनयभंगच
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2019 11:28 AM2019-12-03T11:28:45+5:302019-12-03T11:37:49+5:30
व्हॉटसअॅपसारख्या समाजमाध्यमावर एखाद्या मुलीने तिचे स्टेटस बदलले की, लगेच पाहणे म्हणजे तिच्यावर चोरून नजर ठेवण्यासारखेच आहे.
- बापू सोळुंके
औरंगाबाद : व्हॉटसअॅप, फेसबुक या समाजमाध्यमांवर एखादी स्त्री अथवा मुलीने टाकलेले स्टेटस वारंवार पाहणे हा विनयभंगाचाच प्रकार आहे. कायद्यानुसार हा गुन्हा ठरतो, असे स्पष्ट मत प्रभारी पोलीस आयुक्त निकेश खाटमोडे पाटील यांनी व्यक्त केले. हैदराबादमधील डॉक्टर तरुणीवर सामूहिक अत्याचार आणि जिवंत जाळल्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील महिला पत्रकारांनी खाटमोडे यांची सोमवारी भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. शहरातील महिला आणि तरुणी रात्री-अपरात्री कामावरून घरी परततात. हैदराबादेतील घटनेमुळे शहरातील स्त्रियांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
पत्रकारांशी बोलताना खाटमोडे म्हणाले की, महिलांच्या सुरक्षेसंदर्भात कडक कायदे अस्तित्वात आले आहेत. मुली अथवा महिलांकडे एकटक पाहणे, पाठलाग करणे गुन्हा ठरतो. विशेष म्हणजे हे सर्व करताना त्या व्यक्ती महिलेशी कोणतीही आगळीक केलेली नसली तरी तो सहज आतमध्ये जाऊ शकतो. एवढेच नव्हे, तर व्हॉटसअॅपसारख्या समाजमाध्यमावर एखाद्या मुलीने तिचे स्टेटस बदलले की, लगेच पाहणे म्हणजे तिच्यावर चोरून नजर ठेवण्यासारखेच आहे. अथवा तिचा चोरून पाठलाग करण्यासारखे ठरते आणि याला आता कायद्याने गुन्हा ठरविले आहे.
तसेच कोणत्याही तरुणीने त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराची तक्रार करण्यासाठी सहज पढे आले पाहिजे. त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्यास गुन्हेगाराचे धाडस वाढते आणि नंतर नको ते प्रकार घडतात. पीडिता ही तक्रार करण्यासाठी जेव्हा पोलिसांकडे जाते तेव्हा तिला तिचे नाव प्रकाशित होईल, याची भीती वाटते. तिला संबंधितांना धडा शिकवायचा असतो, अशावेळी आम्ही बऱ्याचदा निनावी तक्रार लिहून घेऊन संबंधितांना अद्दल घडवितो. असेही खाटमोडे म्हणाले.
भादंवि ३५४(ड) मध्ये होते ३ वर्षाची शिक्षा
भादंवि कलम ३५४ (ड) या कलमानुसार कोणत्याही स्त्रीचा चोरुन पाठलाग करणे गुन्हा ठरतो. स्त्रीला स्पर्श न करता केवळ तिचा कोणीतरी गुपचूप पाठलाग केल्याने तिला भीती वाटल्याने हा गुन्हा ठरविण्यात आला. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्यावर चोरून नजर ठेवल्याच्या आरोपाखाली भादंवि ३५४ (ड) मध्ये आरोपीला पहिल्या गुन्ह्यासाठी ३ वर्षे कारावास आणि दंडाची तरतूद आहे, तर दुसरयांदा हाच गुन्हा केल्यास आरोपीला ५ वर्षे शिक्षा आणि दंड ठोठावण्याची कायद्यात तरतूद आहे.