रुग्णालये २४ तास सुरू ठेवा!
By admin | Published: June 5, 2017 03:24 AM2017-06-05T03:24:08+5:302017-06-05T03:24:08+5:30
पावसाळ्यात डोके वर काढणाऱ्या साथीच्या आजारांवर वेळीच प्रभावी नियंत्रण करणे शक्य व्हावे, यासाठी तत्काळ पूर्वतयारी करण्याचे आदेश आरोग्य उपसंचालकांनी दिले
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : पावसाळ्यात डोके वर काढणाऱ्या साथीच्या आजारांवर वेळीच प्रभावी नियंत्रण करणे शक्य व्हावे, यासाठी तत्काळ पूर्वतयारी करण्याचे आदेश आरोग्य उपसंचालकांनी दिले असून ठाणे, पालघर, रायगड तिन्ही जिल्ह्यांतील सर्व महापालिका व सिव्हील रुग्णालयांना २ आॅक्टोबरपर्यंत २४ तास रुग्णालये कार्यरत ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत.
कीटकजन्य व जलजन्य साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी वेळीच पूर्वतयारी करण्याचे आदेश जारी करून २ आॅक्टोबरपर्यंत २४ तास रुग्णालये कार्यरत ठेवण्याचे आदेश आरोग्य उपसंचालक डॉ. रत्ना रावखंडे यांनी सर्व रुग्णालयांना दिले आहेत. यामध्ये ठाणे, पालघर, रायगड अशा जिल्ह्यांतील सर्व सिव्हील रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे यांचा समावेश आहे. याशिवाय ठाणे मनपा,
कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, उल्हासनगर, भिवंडी, मीरा-भार्इंदर आणि वसई-विरार महापालिका रुग्णालयांसाठी आदेश जारी झाले आहेत.
प्रशासकीय यंत्रणा सज्ज ठेवणे, दैनंदिन सर्वेक्षण, जोखीमग्रस्त गावांची निवड व कार्ययोजना, पाणीगुणवत्ता सनियंत्रण, नियमित कीटकशास्त्रीय सर्वेक्षण, एकात्मिक कीटक व्यवस्थापन, पुरेसा औषधसाठा, नियंत्रण कक्षाची स्थापना, मीडिया स्कॅनिंग सेल, शीघ्र प्रतिसाद पथक, गावपातळीवर साथरोग सर्वेक्षणात कार्यकर्त्यांना सहभागी करून घेणे, ग्राम आरोग्य, स्वच्छता व पोषण समित्यांच्या बैठका, आरोग्य शिक्षण आदींची पूर्वतयारी करून घेण्याची सक्ती रुग्णालयांवर करण्यात आली आहे.
नैसर्गिक आपत्तीवर नियंत्रण
अतिवृष्टी, पूर, दरड कोसळणे इत्यादी नैसर्गिक आपत्तीस तोंड देण्यासह संभाव्य जीवित व मालमत्तेची हानी टाळण्याच्या दृष्टीने प्रभावी नियंत्रणाची गरज आहे. त्यासाठी सज्ज राहण्याची गरज आहे.