देशव्यापी संप सुरू, बळीराजा पुन्हा रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 06:34 AM2018-06-02T06:34:22+5:302018-06-02T06:34:22+5:30
राज्यातील शेतकरी संपानंतर आता देशातील बळीराजा शुक्रवारपासून आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरला आहे.
मुंबई : राज्यातील शेतकरी संपानंतर आता देशातील बळीराजा शुक्रवारपासून आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरला आहे. मागण्या पूर्ण होईपर्यंत शहरांची रसद थांबवण्याचा एल्गार शेतकरी संघटनांनी केला आहे. देशातील शेतकऱ्यांनी आज रस्त्यावर शहरांची रसद प्रत्यक्ष थांबवली. त्यामुळे त्याचा परिणाम भाजीपाला पुरवठ्यावर झाला.
देशातील ११० शेतकरी संघटनांनी एकत्र येऊन या देशव्यापी संपाची हाक दिली होती. सरसकट कर्जमाफी व स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी या मागण्यांसाठी देशव्यापी संप सुरू झाला असून, महाराष्ट्रातही ठिकठिकाणी दूध रस्त्यावर ओतून, भाजीपाला फेकून शेतकºयांनी रोष व्यक्त केला.
नगरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात भाकड जनावरे सोडण्यात आली. जळगाव जिल्ह्यात भाजीपाल्यांचे लिलाव बंद पाडण्यात आले. किसान सभेने नगर जिल्ह्यातील अकोले तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. बुलेट ट्रेन आणून शेतकरी उद्ध्वस्त करण्याचा डाव शेतकरी उधळून लावतील, असा इशारा किसान सभेचे अध्यक्ष डॉ.अशोक ढवळे यांनी दिला.
बीड जिल्ह्याच्या रेणापूर तालुक्यातील खलंग्री येथील शेतकºयांनी सकाळीच संप सुरू केला. त्यांनी रेणापूर पिंपळफाटा येथे रास्ता रोको केला़ यावेळी उपसरपंच गजानन बोळंगे यांनी सरणावर बसून आत्मदहनाचा प्रयत्न केला़ पोलिसांनी पेट्रोलच्या बाटलीसह त्यांना ताब्यात घेतले़ जळगावातील चोपडा बाजार समितीत कडकडीत बंद पाळण्यात आला.
नगरमध्ये जोर, अकोले तहसीलवर मोर्चा
अहमदनगरमध्ये शेतकºयांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर भाकड जनावरे नेत आंदोलन केले. दूधदरवाढ करा नाहीतर जनावरांची व्यवस्था सरकारने करावी, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. अकोले तहसीलवर मोर्चा काढण्यात आला. मोर्चेकºयांनी तहसीलदारांच्या दालनासमोर जमिनीवर दूध ओतून निषेध नोंदविला.
गोदाकाठी ४२ गावात दूध संकलन ठप्प
नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी शेतकरी रस्त्यावर उतरले होते. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सिन्नर-शिर्डी महार्गावर सायखेडा चौफुली येथे रस्त्यावर दूध ओतून सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी पोलिसांनी तीन आंदोलन कार्यकर्त्यांनी ताब्यात घेतले. गोदाकाठ भागातील ४२ गावात शेतकºयांनी बंद पाळला असून दूध संकलन केंद्रे बंद होती. खामखेड्यात शेतकºयांनी रस्त्यावर टॉमेटो व कांदे फेकून संपाला पाठिंबा दिला.
कुठे झाला
काय परिणाम?
राजस्थान । शेतकºयांच्या संपामुळे राज्याच्या दक्षिण भागातील श्रीगंगानगर, हनुमानगढ, झुनझुनू या जिल्ह्यांतील भाज्या व दुधाच्या पुरवठ्यावर परिणाम झाला. बिकानेर, नागौर, सिकर जिल्ह्यांनाही शेतकरी संपाची झळ बसली. मात्र दैनंदिन जीवनावर परिणाम झालेला नाही.
उत्तर प्रदेश । येथील संभल जिल्ह्यात भाज्या, दूध व अन्य वस्तूंचा पुरवठा तेथील शेतकºयांनी पूर्णपणे थांबविला आहे. लखनौ व त्याच्या जवळील जिल्ह्यांतील फारच कमी शेतकरी या संपात सहभागी झाले.
पंजाब व हरयाणा । अनेक शहरांना फळे, भाज्या, दूधाचा पुरवठा शेतकºयांनी बंद केला. या संपात सहभागी होण्यासाठी शेतकºयांवर दबाव आणलेला नाही, असे भारतीय किसान युनियनने म्हटले आहे.
मध्य प्रदेश । या राज्यात शेतकरी संपामुळे दैनंदिन जीवनावर परिणाम झाला नसला, तरी भाज्या,दूध व अन्य वस्तुंचा पुरवठा रोखल्याने येत्या काही दिवसांत विविध ठिकाणी त्यांची टंचाई जाणवू लागेल. हा संप देशातील २२ राज्यांत सुरु असल्याचा दावा राष्ट्रीय किसान मजदूर महासंघाने केला असला तरी तसे चित्र दिसलेले नाही.
जम्मू-काश्मीर, कर्नाटकमध्ये या संपाचा विशेष परिणाम जाणवला नाही.