खगोलशास्त्रातील नवे पर्व सुरू
By admin | Published: February 13, 2016 02:36 AM2016-02-13T02:36:14+5:302016-02-13T02:36:14+5:30
गुरुत्वीय लहरींच्या शोधामुळे खगोलशास्त्रातील नव्या पर्वाला सुरूवात झाली असून शास्त्रज्ञांसाठी संशोधन करण्यास मोठे दालन खुले झाले आहे, असे मत ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञांनी व्यक्त केले.
पुणे : गुरुत्वीय लहरींच्या शोधामुळे खगोलशास्त्रातील नव्या पर्वाला सुरूवात झाली असून शास्त्रज्ञांसाठी संशोधन करण्यास मोठे दालन खुले झाले आहे, असे मत ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञांनी व्यक्त केले.
अमेरिकेसह पुण्यातील इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अॅस्टॉनॉमी अॅण्ड अॅस्टोफिजिक्स (आयुका) येथे एकाचवेळी गुरुत्वीय लहरींची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. लेझर इंटरफेरोमीटर ग्रॅव्हीटेशनल वेव्ह आॅब्झर्व्हेटरीच्या (लिगो) अंतर्गत संशोधन करणाऱ्या आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञांच्या गटानेही
या संशोधनात महत्त्वाचे योगदान
दिले आहे.या सर्व शास्त्रज्ञांचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ जयंत नारळीकर, अनिल काकोडकर, डॉ. श्रीधर बॅनर्जी,
अरुण श्रीवास्तव, धीरज बोस,
सुनील मुखी, यशवंत गुप्ता यांनी अभिनंदन केले.
जगात केवळ दोन ठिकाणी लिगो प्रयोग शाळा आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतात तिसरी लिगो प्रगोगशाळा स्थापन करणार असल्याची घोषणा केल्याचे समजताच आयुकातील खगोलप्रेमींनी टाळ््या वाजवून आनंद व्यक्त केला.
जयंत नारळीकर म्हणाले, ‘‘लिगो गटातील शास्त्रज्ञांनी मोठे यश मिळविले असून, ही अनंत काळात लक्षात राहणारी घटना आहे. आयुका स्थापनेच्या वेळी केवळ चार सदस्य होते. त्यावेळी निधी कसा मिळवला असा आमच्या पुढील प्रश्न होता. गुरुत्त्वीय लहरींवर सुरू असलेल्या संशोधनातून काहीही हाती लागणार नाही, असे काहीजण बोलत होते. मात्र, खचून न जाता त्यावरील संशोधन सुरू ठेवले.’’
ज्येष्ठ शास्त्रज्ञ सी. व्ही. विश्वेश्वरा म्हणाले, ‘‘मला कृष्णविवरांचा अभ्यास करता आला. आईन्स्टाईनने मांडलेल्या थेअरीचा अभ्यास करता आला. आज गुरुत्वीय लहरींचा शोध लागला आहे. या ऐतिहासिक क्षणामुळे मी भारावून गेलो आहे.’’
डॉ. अनिल काकोडकर म्हणाले, ‘‘या शोधात भारतीय शास्त्रज्ञांनी मोठे योगदान दिले असून, विज्ञानाच्या इतिहासात नोंद ठेवली जाईल अशीच आजची घटना आहे. भारताने या क्षेत्रातील संशोधनावर गुंतवणूक केली पाहिजे.’’
योगदान देणारे भारतीय शास्त्रज्ञ
आयआयटी गांधीनगर येथील आनंद सेनगुप्ता, तिरुअनंतपुरम येथील अर्जना पै, मुंबईच्या टाटा इन्स्टिट्यूटमधील सी. एस. उन्नीकृष्णन , चेन्नई येथील के. जी. अर्जुन, बेंगलेरू येथील पी. अजिथ, कलकत्ता येथील राजेश नायक, आणि आयुकातील सुखांत बोस यांनी गुरुत्वीय लहरींच्या संशोधनात योगदान दिले आहे.