महापौरपदासाठी रस्सीखेच सुरू
By admin | Published: April 25, 2015 04:14 AM2015-04-25T04:14:17+5:302015-04-25T04:14:17+5:30
येत्या ९ मे रोजी नवी मुंबई महापालिकेची महापौर निवडणूक होणार आहे. आगामी महापौरपद अनुसूचित जातीसाठी राखीव आहे
नवी मुंबई : येत्या ९ मे रोजी नवी मुंबई महापालिकेची महापौर निवडणूक होणार आहे. आगामी महापौरपद अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. यासाठी १११ पैकी ५२ जागा मिळविणाऱ्या राष्ट्रवादीने चार अपक्षांच्या जोरावर सत्तासोपान चढण्याची तयारी सुरू केलेली असतानाच ४४ जागा मिळविणाऱ्या शिवसेना-भाजपा युतीनेही १० जागा जिंकणाऱ्या काँगे्रसला गळ घालून मोर्चेबांधणी सुरू केल्याने या निवडणुकीची चुरस वाढली असून, दोन्ही गटांत अपक्षांना खेचण्यासाठी रस्सीखेच सुरू आहे.
महापालिकेत पाच अपक्ष निवडून आले असून, त्यात राष्ट्रवादीने पुरस्कृत केलेले ज्येष्ठ नगरसेवक सुधाकर सोनवणे, त्यांच्या पत्नी रंजना सोनवणे यांच्यासह सायली शिंदे, श्रद्धा गवस, सीमा गायकवाड यांचा समावेश आहे. यातील अनुसूचित जाती संवर्गातील सोनवणे दाम्पत्याने रिपाइंचे तिकीट नाकारून अपक्ष म्हणून अर्ज दाखल करून विजयाची गुढी उभारली. ते आतापर्यंत सदैव गणेश नाईक यांच्यासोबत राहिले आहेत. त्यामुळे त्यांच्यासह इतर दोन अपक्ष व काँगे्रसपुढे मैत्रीचा हात पुढे करून गणेश नाईक यांनी महापौर निवडणुकीची तयारी सुरू केली.
मात्र, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापौरपदाची आॅफर दिली असून यासाठी त्यांनी रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांची भेट घेतली, असे सुधाकर सोनवणे यांनी सांगितले. महापौरपदासाठी राष्ट्रवादीकडून सहा दावेदार असून यात सोनवणे दाम्पत्यासह रमेश डोळे, निवृत्ती शंकर जगताप, मुद्रिका गवळी, तनुजा श्रीधर मढवी यांचा समावेश आहे. तर सेनेकडून राजू कांबळे, संजू आधार वाडे, नंदा काटे हे तिघे तर काँगे्रसकडून अनिता मानवतकर तसेच सेनेच्या बंडखोर सीमा गायकवाड या अनुसूचित जातीच्या प्रभागातून निवडून आल्या आहेत. (खास प्रतिनिधी)