यश मिळवण्यासाठी सातत्य महत्त्वाचे!

By admin | Published: January 19, 2017 02:38 AM2017-01-19T02:38:20+5:302017-01-19T02:38:20+5:30

सीए होण्याचे ठरवल्यावर त्या दिवसापासून मी मेहनत घ्यायला सुरुवात केली

Continuity to achieve success! | यश मिळवण्यासाठी सातत्य महत्त्वाचे!

यश मिळवण्यासाठी सातत्य महत्त्वाचे!

Next

- पूजा दामले
सीएच्या परीक्षेतील तुझ्या यशाबद्दल काय सांगशील?
- सीए होण्याचे ठरवल्यावर त्या दिवसापासून मी मेहनत घ्यायला सुरुवात केली होती. अभ्यासाचे नियोजन केल्यामुळे मला हे यश मिळाले आहे. देशात दुसरा क्रमांक पटकावला असल्यामुळे त्याचा मला आणि माझ्या कुटुंबीयांना खूप आनंद झाला आहे. या श्रेयामध्ये माझे आई-बाबा, चुलत भावंड आणि शिक्षकांनी दिलेला पाठिंबा महत्त्वाचा आहे. सातत्य, मेहनत आणि नियोजन यामुळेच हे यश मिळाले आहे.
सीएची परीक्षा कठीण असते असे म्हटले जाते, असे का?
- खरे सांगायचे तर सीएची परीक्षा म्हणतात तितकी कठीण नसते; पण या परीक्षेविषयी एक गैरसमज तयार झाला आहे. सीएची परीक्षा खरे म्हणजे अन्य परीक्षांपेक्षा वेगळी असते. इंजिनीयरिंगच्या परीक्षांची काठिण्य पातळी दरवर्षी वाढत जात नाही; पण याउलट सीएच्या परीक्षेचे आहे. पहिल्या टप्प्यावरील परीक्षा ही ५ टक्के कठीण असते. अनेकदा ही मुले परीक्षा देतात आणि पुढेही इतकेच कठीण असेल अशा भ्रमात राहतात; पण इथेच चुकते. सीएच्या प्रत्येक परीक्षेची काठिण्य पातळी ही १० ते २० टक्क्यांनी वाढत जाते. त्यामुळे त्याप्रमाणे तयारी करणे अपेक्षित आहे.
तू अभ्यासाचा पॅटर्न कसा ठेवला होतास?
- बारावीनंतर मी सीए व्हायचे असे ठरवले. त्यामुळे एफवाय बी.कॉमपासून मी अभ्यासाला सुरुवात केली होती. सर्वसाधारणपणे मी दिवसातले १२ तास अभ्यास करायचो. ज्या वेळी माझी आर्टिकलशीप सुरू झाली त्या वेळी अभ्यासाला वेळ कमी मिळायला लागला; पण त्या दिवसांतही मी अभ्यास करतच होतो. रोज २ ते ३ तास मी अभ्यास केला. रोजच्या रोज अभ्यास करणे आवश्यक आहे. क्लासमध्ये तुम्हाला तांत्रिक गोष्टी शिकवल्या जातात; पण तिथेच थांबून चालत नाही. यापुढे जाऊन तुम्हाला स्वत: अभ्यास करावा लागतो. स्वअध्ययन खूप महत्त्वाचे आहे.
सीए होऊ इच्छिणाऱ्या मुलांना काय फॉर्म्युला सांगशील?
- सीए व्हायचे हे फक्त स्वप्न बघून, त्याबद्दल बोलून चालत नाही. तुम्हाला खरेच आवड आहे का? हा विचार त्या विद्यार्थ्याने स्वत: केला पाहिजे. आवड असेल, अभ्यास करायची तयारी असेल, तरच तुम्ही सीए होऊ शकता. अभ्यासक्रम कठीण आहे; पण तुम्हाला आवड असल्यास तो तुम्ही आवडीने करता. शाळेत असताना मी हुशार मुलांच्यात गणला जात नव्हतो. सर्वसाधारण विद्यार्थी होतो. माझी चुलत भावंड सीए आहेत. त्यांच्याशी बोलून त्यांच्याकडून जाणून घेतल्यावर मला आवड निर्माण झाली. त्यामुळे मी नेटाने अभ्यास केला; पण सीए करताना मजा-मस्ती, घरातील समारंभ येथे जाता येत नाही. अभ्यास एके अभ्यास करावा लागतो. आर्टिकलशीपच्या तीन वर्षांत अभ्यास करणे आवश्यक आहे. कारण, दोन वर्षे काहीच अभ्यास न करता तिसऱ्या वर्षी अभ्यास सुरू केल्यास तो पूर्ण करणे शक्य नसते.
तुझ्या घरचे वातावरण अभ्यासासाठी पोषक होते का?
- माझ्या घरात आई, बाबा आणि छोटा भाऊ आहे. माझ्या वडिलांचे जनरल स्टोअर आहे. आम्ही मूळचे राजस्थानचे आहोत; पण लहानाचा मोठा मी भिवंडीमध्येच झालो. मुलुंडच्या कॉलेजमध्ये पदवी शिक्षण पूर्ण केले. माझ्या घरात कोणी सीए नाही. मी जिथे नोकरी करत होतो तिथे सीए होते. त्यामुळे आवड निर्माण झाली; पण घरातल्या सर्वांनी मला खूप मदत केली. हे वातावरण माझ्यासाठी नेहमीच पोषक ठरले.
चार्टर्ड अकाउंट्सच्या (सीए) परीक्षेत महाराष्ट्राचा झेंडा फडकवत भिवंडीच्या पीयूष लोहियाने दुसरा क्रमांक पटकवला. मूळचा राजस्थानचा असणारा पीयूष भिवंडीमध्येच लहानाचा मोठा झाला. यंदा सीएच्या परीक्षेत ग्रुप १ आणि गु्रप २चा मिळून ११.५७ टक्के निकाल लागला आहे. त्यामध्ये पीयूषने ८०० पैकी ५७४ गुण मिळवले आहेत. मुलुंड कॉलेज आॅफ कॉमर्समध्ये त्याने त्याचे पदवी शिक्षण पूर्ण केले. सीएची कठीण असणारी परीक्षा सहज, सोप्या पद्धतीने सोडवण्याचे गुपितही त्याने ‘लोकमत’शी शेअर केले...

Web Title: Continuity to achieve success!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.