मध्य महाराष्ट्र, विदर्भात उष्णतेची लाट कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 04:43 AM2019-05-20T04:43:58+5:302019-05-20T04:44:00+5:30
देशात चंद्रपूर सर्वाधिक तापलेलेच; मान्सून अजून अंदमानच्या समुद्रातच
पुणे : मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट कायम आहे़ सलग दुसऱ्या दिवशी चंद्रपूर येथे नोंदविलेले गेलेले ४५़८ अंश सेल्सिअस हे देशातील सर्वाधिक तापमान ठरले आहे़ राज्यात रविवारी सर्वाधिक कमाल तापमान चंद्रपूर येथे ४५़६ अंश सेल्सिअस तर, सर्वात कमी किमान तापमान पुणे येथे २१ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे़ कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे़
मान्सून आगमन दक्षिण अंदमानच्या समुद्र, निकोबार बेट येथे झाल्याचे हवामान विभागाने शनिवारी जाहीर केले होते़ रविवारी मान्सून अंदमानच्या समुद्रातच असून अंदमान बेट, दक्षिण बंगालचा उपसागर परिसरात २ ते ३ दिवसांत दाखल होण्याच्या दृष्टीने अनुकूल वातावरण असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे़
पुढील दोन तीन दिवस अंदमान बेट व परिसरात जोरदार पावसाची शक्यता आहे़ मराठवाड्याच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या किंचित वाढ झाली आहे़ मध्य महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणचे कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे़ मराठवाड्यातील कमाल तापमान ४० ते ४२ अंश सेल्सिअसपर्यंत गेले आहे़
२१ ते २३ मे दरम्यान कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे़ २० मे रोजी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे़ २१ ते २३ मे दरम्यान विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़
राज्यातील प्रमुख शहरातील कमाल तापमान (अंश सेल्सिअस) : पुणे ४०, लोहगाव ४१, जळगाव ४२़६, कोल्हापूर ४१़२, महाबळेश्वर ३५़५, मालेगाव ४१़४, नाशिक ३९़२, सांगली ४२, सातारा ४०़४, सोलापूर ४३़८, मुंबई ३४़२, सांताक्रुझ ३६, अलिबाग ३३़८, रत्नागिरी ३५़४, पणजी ३३़८, डहाणू ३४़४, औरंगाबाद ४०़८, परभणी ४४, नांदेड ४२़५, बीड ४२़७, अकोला ४३़८, अमरावती ४३़६, बुलढाणा ४०़७, ब्रम्हपुरी ४५़५, चंद्रपूर ४५़६, गोंदिया ४३, नागपूर ४४़१, वाशिम ४२़८, वर्धा ४४़५, यवतमाळ ४२़५़