‘एमबीए’च्या विद्यार्थ्यांमध्ये सातत्याने घट
By admin | Published: March 7, 2016 03:34 AM2016-03-07T03:34:40+5:302016-03-07T03:34:40+5:30
अभियांत्रिकीसोबतच राज्यात व्यवस्थापन अभ्यासक्रमांनादेखील विद्यार्थ्यांच्या दुष्काळाचा सामना करावा लागतो आहे. गेल्या दशकात पदव्युत्तर शिक्षणासाठी विद्यार्थ्यांची सर्वात मोठी
योगेश पांडे, नागपूर
अभियांत्रिकीसोबतच राज्यात व्यवस्थापन अभ्यासक्रमांनादेखील विद्यार्थ्यांच्या दुष्काळाचा सामना करावा लागतो आहे. गेल्या दशकात पदव्युत्तर शिक्षणासाठी विद्यार्थ्यांची सर्वात मोठी पसंती असलेल्या ‘एमबीए’ची क्रेझ हळूहळू सरत चालली आहे. गेल्या चार वर्षांपासून सातत्याने विद्यार्थ्यांची संख्या कमी होत असून, पदव्युत्तर व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयांची संख्यादेखील सुमारे ११ टक्क्यांनी घटली आहे.
‘एआयसीटीई’च्या (आॅल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन) आकडेवारीनुसार २०१२ सालापासून महाविद्यालयांची संख्या सातत्याने कमी होत असून, विद्यार्थ्यांची प्रवेशक्षमतादेखील कमी झाली आहे. २०१२ साली महाराष्ट्रात ४५९ महाविद्यालयांत हे दोन्ही अभ्यासक्रम होते. २०१५ मध्ये हाच आकडा ४०६ वर पोहोचला. केवळ तीन वर्षांत ५३ महाविद्यालये बंद झाल्याचे दुर्दैवी चित्र राज्यात पाहायला मिळाले.
महाविद्यालयांची संख्या कमी झाल्यामुळे ओघाने प्रवेशक्षमतेतही घट झाली. ०१२ मध्ये जी प्रवेशक्षमता ६४ हजार ४१६ होती ती २०१५ मध्ये ५५ हजार ८०१ वर पोहोचली. तीन वर्षांतच ८ हजार ६१५ म्हणजे सुमारे १३.४ टक्के जागा कमी झाल्या.
२०१२पासूनच्या आकडेवारीनुसार ‘एमबीए’ किंवा ‘एमएमएस’ अभ्यासक्रमांत प्रवेश घेण्यासंदर्भात विद्यार्थ्यांमध्ये निरुत्साह दिसून येत असल्याचे स्पष्ट होते. प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना मोठी स्वप्ने दाखविली जातात. मात्र, त्यानंतर त्यांच्या पदरी निराशाच येते. यातूनच महाविद्यालयांतील जागा रिकाम्या राहण्यास सुरुवात झाली. २०१२ साली राज्यातील २५ हजार १७६ (३९ टक्के) जागा रिक्त होत्या. २०१५ मध्ये हा आकडा ३२ ते ३६ टक्क्यांच्या घरात होता.