महाराष्ट्र विधिमंडळ, आॅस्ट्रेलिया संसदेत करार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2017 04:17 AM2017-05-06T04:17:02+5:302017-05-06T04:17:02+5:30
महाराष्ट्र विधिमंडळ आणि न्यू साऊथ वेल्स संसद (आॅस्ट्रेलिया) यांच्यात संसदीय सामंजस्य करार करण्यात आला. या
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळ आणि न्यू साऊथ वेल्स संसद (आॅस्ट्रेलिया) यांच्यात संसदीय सामंजस्य करार करण्यात आला. या ऐतिहासिक करारावर विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर व विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी तर न्यू साऊथ वेल्स संसदेच्या (आॅस्ट्रेलिया) वतीने न्यू साऊथ वेल्स कौन्सिलचे सभापती जॉन अजाका आणि विधिमंडळ अध्यक्षा श्रीमती शेली हँकॉक यांनी स्वाक्षऱ्या केल्या.
विधिमंडळाचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ सध्या आस्ट्रेलिया, न्यूझीलंड व सिंगापूर या देशांच्या अभ्यास दौऱ्यावर आहे. या शिष्टमंडळाने आॅस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्स संसदेस भेट दिली. या वेळी सिडनी (आॅस्ट्रेलिया) येथील न्यू साऊथ वेल्स संसदेच्या प्रेस्टिन सभागृहामध्ये सामंजस्य करार झाला.
या करारामध्ये प्रामुख्याने दोन्ही विधिमंडळाच्या संसदीय संदर्भात माहिती आदान-प्रदान करणे, संसदीय प्रथा परंपरा यांचा अभ्यास करणे, नियम, प्रश्न व इतर संसदीय आयुधे उदा. ठराव, प्रस्ताव, विधेयके, अर्थसंकल्पीय प्रक्रिया, समिती पद्धती इत्यादी संसदीय विषयांबाबत एकमेकांची कार्यपद्धती जाणून घेऊन विधिमंडळाचे कामकाज अधिक लोकाभिमुख व सक्षमपणे परिणामकारक करणे आणि वेळोवेळी विविध विषयांशी निगडित परिषदा व चर्चासत्रांचे आयोजन करणे या मुद्द्यांचा समावेश आहे.
या वेळी उपसभापती माणिकराव ठाकरे, संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट, कृषी, फलोत्पादन मंत्री पांडुरंग फुंडकर, विधान परिषद सदस्य शरद रणपिसे, नीलम गोऱ्हे, संजय दत्त आदी उपस्थित होते.