देशी गायींच्या वाणासाठी शासन करणार पतंजलीसोबत करार : मुख्यमंत्री
By admin | Published: November 16, 2016 06:10 PM2016-11-16T18:10:44+5:302016-11-16T18:10:44+5:30
देशी गाईचे वाण तयार करण्यासाठी पतंजली व महाराष्ट्र सरकार यांच्यात करार केला जाईल. त्यामुळे शेतकऱ्यांकडे देशी गाई उपलब्ध होतील
ऑनलाइन लोकमत
अहमदनगर, दि. १६ : देशी गाईचे वाण तयार करण्यासाठी पतंजली व महाराष्ट्र सरकार यांच्यात करार केला जाईल. त्यामुळे शेतकऱ्यांकडे देशी गाई उपलब्ध होतील. परिणामी लाखो लिटर दूध उत्पादन होणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. खडकाफाटा (ता. नेवासा) येथे पतंजलीच्या दूध प्रक्रिया प्रकल्पाचे उद्घाटन बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, गेल्या १५ वर्षांपासून शेतमालाला, दुधाला भाव नाही. आतापर्यंत सहकारात फक्त माणसं मोठी झाली. अनेकांनी आपापल्या तालुक्यात दुधाचे ब्रँड तयार केले. त्यामुळे राज्याचा दुधाचा ब्रँड बुडाला. आता हा ब्रँड पतंजलीबरोबर करार करून पुढे नेऊ, असेही ते म्हणाले.
नागपूर येथे अन्नप्रक्रिया उद्योगासाठी पतंजलीला शासनाने जागा दिली, त्यावर विरोधकांनी आरोप केले. त्यामुळे आपण तीन वेळी निविदा काढल्या. पतंजलीशिवाय कोणाचीही मोठी निविदा नव्हती. पतंजलीने ज्या भावात जागा घेतली त्या भावात कोणी घेणार असेल तर आपण निविदाही काढणार नाही, असा टोला त्यांनी विरोधकांना मारला. काळ्यापैशाविरोधात पंतप्रधान मोदींनी उचललेले पाऊल सकारात्मक आहे. त्यामुळे आतंकवाद्यांची आर्थिक नाकेबंदी झाल्याने त्यांना लगाम बसला आहे, असेही ते म्हणाले.
यावेळी रामदेव बाबा यांनी योगाचे धडे दिले. पशुदुग्धविकास मंत्री महादेव जानकर, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, पालकमंत्री राम शिंदे, आमदार शिवाजी कर्डिले, बाळासाहेब मुरकुटे आदी यावेळी उपस्थित होते.