जुईनगरमध्ये ठेकेदाराने तोडली जलवाहिनी
By Admin | Published: January 17, 2017 03:09 AM2017-01-17T03:09:08+5:302017-01-17T03:09:08+5:30
जुईनगर सेक्टर २४ मध्ये गटाराचे काम करणाऱ्या ठेकेदाराने जलवाहिनी तोडली आहे
नवी मुंबई : जुईनगर सेक्टर २४ मध्ये गटाराचे काम करणाऱ्या ठेकेदाराने जलवाहिनी तोडली आहे. नागरिकांनी विनंती करूनही ठेकेदाराने वाकलेला पाईप दुरूस्त करण्यास नकार दिला आहे. पालिका प्रशासनही त्याला पाठीशी घालत असून स्वखर्चाने पाईप बसविण्याच्या सूचना दिल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
येथील पंचरत्न सहकारी सोसायटीसमोरील नाला दुरूस्ती व मलनि:सारण वाहिनी टाकण्याचे काम पालिकेने सुरू केले आहे. जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम करत असताना ठेकेदाराने येथील ॐकार गृहनिर्माण सोसायटीला पाणीपुरवठा करणारा पाईप तोडला व एक ठिकाणी वाकविला आहे. यामुळे दोन दिवस रोज हजारो लिटर पाणी वाया गेले. नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने पाणी गळती थांबविली पण वाकलेला पाईप सरळ केला नाही. यामुळे ॐकार सोसायटीला आठ दिवसापासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. नागरिकांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना हे निदर्शनास आणून दिले पण पाणी पुरवठा विभागाने संबंधित ठेकेदाराला पाठीशी घालण्यास सुरवात केली आहे. सोसायटीने स्वखर्चाने पाईप बदलून घ्यावा अशा सूचना दिल्या आहेत. पालिकेचे अधिकारी पाठीशी घालत असल्याने ठेकेदारानेही नागरिकांच्या विनंतीकडे दुर्लक्ष केले आहे. पाईप दुरूस्त करून देणार नाही असे स्पष्ट केले असल्याने नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होवू लागला आहे.
पंचरत्न सोसायटीसमोर गटाराचे काम करणाऱ्या ठेकेदाराने सर्व नियम धाब्यावर बसविले आहेत. काय काम सुरू आहे व कधी पूर्ण केले जाणार याचा फलक लावलेला नाही. गटार खोदून ठेवले असून तेथे अपघात होवू नये यासाठी बॅरिकेट व परावर्तक पट्ट्या बसविल्या नाहीत. यामुळे आठ दिवसामध्ये तीन जण गटारामध्ये पडले आहेत. वेळेत काम पूर्ण केले नाही तर अजून अपघात होण्याची शक्यता आहे. ठेकेदाराच्या चुकीमुळे पंचरत्न सोसायटीमधील ८० सदनिकाधारकांना त्यांच्या घरात ये - जा करता येत नाही व ॐकार सोसायटीमधील ८० सदनिकाधारकांना पुरेसे पाणी मिळत नसल्याची प्रतिक्रिया येथील रहिवासी सागर लकेरी यांनी दिली आहे.